
सिंधुदुर्गनगरी : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत जेष्ठ कलाकार व साहित्यिक यांची निवड करणे करता सन 2025 ते 27 या कालावधीसाठी समिती गठीत करण्यात आली असून या समितीची पहिलीच सभा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. जिल्ह्यातील 100 वयोवृद्धांना राजर्षी शाहू महाराज कलाकार मानधन समिती मार्फत शासकीय मानधन देऊन कलाकारांचा सन्मान करण्याचे यावेळी ठरले.
वृद्ध कलाकार व साहित्यिक यांना वयोवृद्ध काळात शासकीय मानधन प्राप्त व्हावे यासाठी राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना शासन राबवते. या योजनेअंतर्गत कलाकारांना मानधन प्राप्त होते.यासाठीची समिती देखील गठीत करण्यात आली असून यामध्ये अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तसेच सदस्य कलाकार संतोष हरिश्चंद्र कानडे, रितेश गणपत सुतार, विष्णू शिवा सुतार, अजिंक्य कृष्णा पाताडे, संदीप पायाजी नाईकधुरे, मयूर मंगेश ठाकूर, विजय मधुकर सावंत, भालचंद्र भगवान केळुसकर, महेंद्र एकनाथ गवळी यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच राघोजी भगवान सावंत यांची साहित्यिक सदस्य म्हणून निवड झाली तर सदस्य म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तसेच सहाय्यक संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय पुणे तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची सचिव पदी निवड झाली.
या सभेदरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे तसेच आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्या आभाराचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.