आत्मेश्वर देवस्थानासह विकासकामांस १ कोटी मंजूर

मंत्री केसरकरांचे मानले आभार | देव्या सुर्याजींच्या मागणीला यश
Edited by: विनायक गावस
Published on: March 15, 2024 14:44 PM
views 87  views

सावंतवाडी : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व दोन शिवलिंग असणाऱ्या श्री देव आत्मेश्वर मंदिराच्या धार्मिक पर्यटन विकासासाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंत्री दीपक केसरकर यांनी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. तर होळीचा खुंट येथील ओपन जिम व इतर सुविधांसाठी ५० लक्ष मंजूर करण्यात आले आहेत.

नगरपरिषद हद्दीतील आत्मेश्वरतळी परिसर अंतर्ग विविध विकासकामांसाठी पहिल्या टप्प्यात हे ५० लक्ष मंजूर करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे खेळाचे मैदान या आरक्षणाचा विकास करण्यासह  नरेंद्र डोंगर होळीचा खुंट येथे ओपन जिम व इतर सुविधा निर्माण करण्यासाठी ५० लक्ष मंजूर करण्यात आले आहे. दोन्ही विकासकामांना १ कोटीचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी आभार मानले आहेत. तर माठेवाडा व जुना बाजार परिसरात नागरिकांनी दीपक केसरकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.