कोचरेतील दरड प्रवण क्षेत्राला १ कोटी ५५ लाखांचा निधी

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर
Edited by: दिपेश परब
Published on: February 04, 2024 15:17 PM
views 420  views

वेंगुर्ले : राज्य शासनाच्या आपत्ती सौम्यीकरण योजने अंतर्गत कोचरे भटवाडी येथील पिंगळे व चौधरी यांच्या घराच्या ठिकाणी दरड प्रतिबंधक संरक्षक उपाययोजना करणे या कामासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत १ कोटी ५५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. 

कोचरा येथील भटवाडी चौधरी व पिंगळे यांच्या घराजवळील जागेत दरवर्षी अतिवृष्टीत किंवा मोठा पाऊस झाल्यास डोंगर कोसळत असतो. त्यामुळे या घरांना लागून  असलेल्या १५ ते २० घरांना धोका निर्माण होतो. मागील पाच वर्षांपूर्वी कोचरे गावात जी आपत्ती परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी हा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्या भागात संरक्षक भिंत बांधून उपाययोजना करणे गरजेचे होते. याची दखल तात्काळ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेऊन या भागात संरक्षक भिंत बांधून उपाययोजना करणे या कामासाठी १ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांचे विशेष सहकार्य लाभले. 

या कामामुळे येथील वस्तीला होणारा धोका आता टळणार आहे. या कामाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून लवकरच हे काम सुरू होणार असल्याची माहिती कोचरे सरपंच योगेश तेली यांनी दिली आहे. हे काम मंजूर केल्याबद्दल कोचरे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.