
वैभववाडी :येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्यावतीने उद्या (ता.८) “तणाव व्यवस्थापन आणि आत्महत्या प्रतिबंध” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.महाविद्यालयाच्या सभागृहात ही कार्यशाळा होणार असून विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेला मानसिक ताण, तणाव हाताळण्याच्या प्रभावी पद्धती तसेच आत्महत्येपासून प्रतिबंधासाठी आवश्यक जनजागृती यावर या कार्यशाळेत भर देण्यात येणार आहे.
या कार्यशाळेत रत्नागिरी येथील गोगटे–जोगळेकर महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. बीना शेटे–कळबंटे तसेच सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा. राजेंद्र शिंत्रे हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते तणाव ओळखणे, त्यावर उपाययोजना, सकारात्मक जीवनशैली, समुपदेशनाचे महत्त्व तसेच आत्महत्या प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या आवश्यक खबरदारीबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.या कार्यशाळेला विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्र. प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी आणि मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. एम. गुलदे यांनी केले आहे.










