शिवविचारांचा जागर काळाची गरज | शिवव्याख्याते अँड शिवाजी देसाई

दोडामार्ग तालुक्यातील आयनोडे झरे १ मध्ये झाले व्याख्यान
Edited by: संदीप देसाई
Published on: April 03, 2023 17:09 PM
views 206  views

दोडामार्ग : आजच्या कलियुगात भगवद गीतेतील अठराव्या अध्यायात असलेल्या कर्मयोगाचे महत्व प्रचंड आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्या कर्तुत्व आणि नेतृत्वातून गीतेमधील कर्मयोग खऱ्या अर्थाने जगला आणि हिंदवी स्वराज्य उभे केलें आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे कर्मयोगी महापुरुष होते असे प्रतिपादन गोव्यातील सुप्रसिद्ध शिव व्याख्याते अँड शिवाजी देसाई यांनी दोडामार्ग तालुक्यातील आयनोडे झरे  १ ह्या गावात राम नवमी उत्सवानिमित्त आयोजीत "शिवचरीत्र व्याख्यान" कार्यक्रमात प्रमुख वक्ते ह्या नात्याने बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर महादेव लक्ष्मण ठाकूर गुरुजी, कोकणसाद LIVE व दैनिक कोकणसादचे ब्युरो चीफ संदीप देसाई, डॉ.नितीन सावंत, माजी उपसरपंच आयनोडे सरगवे ग्रामपंचायत आणि माजी केंद्र प्रमुख लक्ष्मण भिकाजी सावंत, नकुल चोर्लेकर, हर्षद सावंत, उल्हास सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

अँड. शिवाजी देसाई पुढे म्हणाले की, माणसांमधील सामर्थ्याचा आविष्कार हा कर्मयोगातून होत असतो. शिवरायांनी सर्वप्रथम आपल्या रयते मध्ये विश्वास आणि सामर्थ्य जागविले. त्या साठी त्यांनी सुरवातीला पुण्याच्या जमिनीत सोन्याचा नांगर धरला. शेतीसाठी बंधारे उभे केले आणि मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची शपथ घेतली. हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी एक सुनियोजित योजना तयार करण्यात आली होती. त्या करीता पुण्याच्या जहागिरी मध्ये शिवरायांच्या युवा अवस्थेपासूनच त्यांच्या सोबत अष्ठप्रधान मंडळ होते. स्वराज्यात प्रत्येक मावळ्याचा आत्मसन्मान राखला जायचा. शिवरायांचा मावळा हा कोणत्याही जाती धर्माचा असो, तो फक्त "मराठा" ह्या नावाने ओळखला जायचा. मराठा ही जात नसून तो एक पराक्रमी लोकांचा समूह आहे. आणि जगाच्या पाठीवर मराठ्यांनी प्रचंड मोठे सामर्थ्य आणि पराक्रम गाजवले आहेत. शिवरायांनी हिंदूंची उद्वस्थ झालेली मंदिरे उभी केली. संपूर्ण समाज एकत्र यावा हीच त्यांची यामागील भावना होती. शिवरायांनी कधीच दुसऱ्या समोर हात पसरले नाहीत. वास्तविक त्यांनी जर त्यांच्या वडिलांचा वशिला वापरला असता तर त्यांना सहज एक मोठी सरदारकी मिळाली असती पण त्यांनी तसे केले नाही. उलट समोर प्रचंड मोठ्या अडचणी, आणि समोर बलाढ्य मोठ्या पातशहा असताना स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेऊन ते पूर्णत्वास आणले. आज आपल्यास महत्वाचे आहे ते म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जागर होणे. आणि तो प्रत्येक घराघरात व्हायला हवा. लहान मुलांना लहान पणापासूनच शिवरायांच्या विचारांचे धडे आपण दिले पाहिजेत.

याप्रसंगी महादेव लक्ष्मण ठाकूर गुरुजी यांचा अँड शिवाजी देसाई यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. डॉ. नितीन सावंत यांचा गौरव शाल आणि श्रीफळ देऊन दैनिक कोकण\सादचे ब्यूरो चीफ संदीप देसाई यांनी केला. तर अँड.  शिवाजी देसाई यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा गौरव लक्ष्मण ठाकूर गुरुजी यांनी केला. वक्त्यांची ओळख डॉ. नितीन सावंत यांनी करून दिली. सूत्रसंचालन अरुण सावंत यांनी केले. ठाकूर गुरुजी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद लाभला.