
मनोहर धुरी
राजापूर ः तालुक्यातील साखर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्वच गावांत समाजात प्रचलीत असलेल्या अनिष्ठ विधवा प्रथा कायमस्वरूपी बंद करण्याचा एकमुखी ठराव घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे याची सुरुवातसुद्धा साखर ग्रामपंचायत सडे - चव्हाणवाडी गावातून करण्यात आली आहे. त्यामुुळे साखर ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साखर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच प्रत्येक गावात एक सभा अशा ७ - ८ सभा घेऊन ही प्रथा किती अनिष्ठ आहे, याबाबत सविस्तर समजावून सांगितले. यावेळी ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आज विज्ञानयुगात वावरत असताना विज्ञानवादी व प्रगतशील समाज म्हणून आपण वाटचाल करीत आहाेत. मात्र आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ठ प्रथा प्रचलीत असल्याचे आढळून येते. पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे अशा वाईट व अनिष्ठ प्रथा प्रचलीत अाहेत. समाजात विधवा महिलांना सार्वजनिक उत्सवात सहभागी करून घेतले जात नाही. विशेष म्हणजे या महिलांनी सार्वजनिक उत्सवात केलेले काम, केलेले जेवण देवाला नैवेद्य चालतो. पण उत्सवात त्यांचा सहभाग चालत नाही, यावरून ही प्रथा बंद होणे गरजेचे आहे, असे विचार यावेळी मांडण्यात आले.
साखर ग्रामपंचायतीने ही अनिष्ठ प्रथा बंद केली असून त्याची कार्यवाहीसुद्धा झाली आहे. यासाठी सरपंच दशरथ मांजरेकर, उपसरपंच रामचंद्र चव्हाण, सदस्य मोहन भोसले, जयेश मांजरेकर, विशाखा मिरगुले, आकांश मोंडे, सुप्रिया चव्हाण, सुचिता कांबळी, श्रृती मिरगुले, मुंबई मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ मिरगुले, ग्रामसेवक सुधीर संखे, पोलीस पाटील रोहिदास कांबळी व सर्व ग्रा. पं. कर्मचारी, ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली.