
वेंगुर्ले: भाजप पक्षात पुन्हा प्रवेश केल्यानंतर युवा नेते विशाल परब यांनी प्रथमच वेंगुर्ला तालुका भाजप कार्यालयाला भेट देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी, वेंगुर्ला तालुक्यात एक नंबरवर असलेल्या भाजपला आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अग्रेसर ठेवण्यासाठी अधिकची ताकद दिली जाईल, असे प्रतिपादन विशाल परब यांनी केले.
येथील भाजप कार्यालयात विशाल परब बोलत होते. यावेळी, सर्वप्रथम भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब यांनी विशाल परब यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने परब यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, ओबीसी सेलचे श्री. नार्वेकर, मच्छिमार नेते दादा केळुसकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले, "भाजप पक्ष देशात व राज्यात एक नंबरचा पक्ष आहे. भाजप पक्ष माझ्या हृदयात आहे, यामुळे आयुष्यभर पक्षासोबत राहणार. मागील गोष्टी विसरून सर्वांनीच पक्षवाढीसाठी जोमाने काम करूया. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद-पंचायत समितीमध्ये पक्ष ज्या व्यक्तीला तिकीट देईल त्याला निवडून आणण्यासाठी जोमाने काम करूया. जिथे काही कमी असेल तिथे एकवाक्यता ठेऊन काम करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात भाजप पक्ष नंबर एकवर ठेवू."
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष पप्पू परब म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी २०२९ मध्ये आपल्याला 'शत प्रतिशत भाजप' म्हणून लढायचे आहे. कार्यकर्त्यांनी कोणाचे समर्थक न बनता पक्षाचे म्हणून राहावे. पक्ष हा सर्वांचा आहे. पक्षात प्रामाणिकपणा असेल तर निश्चितच पक्ष त्याची दखल घेतो. कार्यकर्ता जर टिकला, तर पक्ष मोठा होईल. त्यामुळे युवा वर्गाने नेता न बनता कार्यकर्ता बनावे, असे सांगत त्यांनी विशाल परब यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप म्हणाले, 'शत प्रतिशत भाजप' हे वेंगुर्ल्यात खरे करून दाखवायचे आहे. नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी विशाल परब यांच्या ताकदीचा फायदा निश्चितच होईल, असे ते म्हणाले.
प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी केले, तर जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य महेंद्र मातोंडकर यांनी पत्रकार संघाच्या वतीने विशाल परब यांना शुभेच्छा दिल्या.