
कणकवली : जि. प. शाळा भरणीचे मुख्याध्यापक के. टी. कळसुलकर यांना कार्यमुक्त करा, अशी तक्रार काही ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांच्याकडे दिली होती. त्यांच्या तक्रारीला गावातून विरोध आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाºयांनी कुणाच्या दाबावाखाली मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई केल्यास शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन सरपंच अनिल बागवे यांच्या नेतृत्वखालील शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांना दिले. याबाबत चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन चव्हाण यांनी दिले.
निवेदनात म्हटले आहे की, भरणी शाळेचे मुख्याध्यापक के. टी. कळसुलकर यांच्याविरोधात काही ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकाºयांकडे केली आहे. या व्यक्तींनी वैयक्तिक हेतूने मुख्याध्यापकांविरुद्ध चुकीची तक्रार दिली आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाºयांनी मुख्याध्यापक यांच्यावर कुणाच्या दबावाखाली कारवाई करू नये. श्री. कळसुलकर यांच्या कार्यपद्धतीमुळे शाळेत सकारात्मक बदल घडले आहेत. त्यांच्या कार्यकाळात शाळेला आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे. संगणक शिक्षण व केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धांचे आयोजनामुळे शाळेची शैक्षणिक व सांघिक कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. यापूर्वी शाळेच्या निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता नव्हती. पण कळसुलकर हे आल्यापासून हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. शाळेतील पालक, माजी विद्यार्थी आणि गावकरी आता उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. काही ग्रामस्थांनी मुख्याध्यापकांवर राष्ट्रगीताच्या अवमानाचा आरोप केला आहे. मात्र, त्यामागील वस्तुस्थिती वेगळी आहे. त्या ग्रामस्थांनी तक्रारी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे थेट न देता प्रथम शाळा व्यवस्थापन समितीकडे करणे गरजेचे होते. शिक्षण विभागाच्या अधिकाºयांनी मुख्याध्यापकांविरुद्ध अन्यायकारक व एकतर्फी कारवाई करू नये. प्रशासनाने योग्य ती वस्तुनिष्ठ चौकशी करून निर्णय घ्यावा, अशी मागणी आहे. निवेदन देतेवेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष गंगाराम गुरव, पोलीस पाटील लक्ष्मीकांत ताम्हणकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष स्नेहा घाडीगावकर, प्रकाश गुरव, सुहास पाडावे, दाजी साटम, सोनल लाड, अस्मिता गुरव, दत्ताराम पाडावे, वासंत परब, सुहास पाडावे, रमेश जगताप, पंढरीनाथ साटम, सचिन चव्हाण, विखाशा दळवी, सचिन दळवी, चंद्रकांत दळवी, संदीप सावंत, प्रमोद परब, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, गणपत गुरव, संजय कांडर आदी उपस्थित होते.