
सावंतवाडी : हल्ली कोणताही आनंदोत्सव हा व्यसनाला जोडून साजरा केला जातो. ही आपली भारतीय संस्कृती नव्हे. आज अनेक गावात व्यसनांमुळे युवा पिढी बरबाद होत आहे. हे थांबविण्यासाठी प्रत्येक गावातील पोलीस पाटलांनी ठोस पावले उचलावीत असे मत नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी व्यक्त केले. सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे आयोजित पोलीस पाटील यांच्या कार्यशाळेत सौ. मुंबरकर बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक जयेश खंदरकर आदी उपस्थित होते. यावेळी सौ. अर्पिता मुंबरकर यांनी 'Say No To Drug's Yas To life' या अनुषंगाने उपस्थित पोलीस पाटलांशी पोस्टरच्या माध्यमातून संवाद साधला. त्या म्हणाल्या, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ, दारू, अमली पदार्थ या सर्व व्यसनांचा समाजावर विशेषतः युवकांच्या जीवनावर फार मोठा घातक परिणाम होत आहे. आज गाव किंवा राज्य नव्हे तर देश पातळीवर व्यसनांना मिळणारी प्रतिष्ठा, व्यसनांना जोडून घेऊन आनंद साजरा करण्याची पद्धत रूढ होताना दिसत आहे. ही प्रथा आपल्या सर्वांसाठी धोक्याची ठरत आहे. यासाठी वेळीच सावध होऊन गाव शहर, शाळा, महाविद्यालय, तसेच सार्वजनिक ठिकाणी व्यसनांच्या विरोधात जनजागृती करायला हवी, असे विचार अर्पिता मुंबरकर यांनी व्यक्त केले. यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण व प्रा. रुपेश पाटील यांनीही मनोगते व्यक्त केली. शेवटी उपस्थितांना व्यसन मुक्तीची प्रतिज्ञा देण्यात आली.
दरम्यान, कोणत्याही गावाचा महत्त्वाचा कणा हा त्या गावाचा पोलीस पाटील असतो. गावात कोणतीही बरी - वाईट घटना घडली तर त्याची तात्काळ दखल घेऊन योग्य ती भूमिका घेण्याची महत्त्वाची जबाबदारी पोलीस पाटील यांना पार पाडावी लागते. म्हणून आदर्श व निकोप ग्रामनिर्मितीसाठी पोलीस पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते, असे मत व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावात अनैतिक गोष्टी घडत असतील तर त्या तात्काळ थांबवण्यासाठी पोलीस पाटील यांनी पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच निकोप व व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठीही पोलीस पाटील यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरते. गावातील युवकांवर योग्य संस्कार होण्यासाठी तसेच त्यांनी अनैतिक मार्गावर जाऊ नये याकरिता पोलीस पाटील यांची जबाबदारी फार मोठी असून अनेकजन हे कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडतात. अशा पोलीस पाटलांची शासनस्तरावर दखल घेतली जाते व त्यांना पुरस्काराने सन्मानित केले जाते, असेही प्रा. पाटील म्हणाले. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सदर कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करून पोलीस पाटील पोलिसांना कशा पद्धतीने मदत करू शकतात?, याचे विश्लेषण केले.