
दोडामार्ग : विधानसभेत विरोधी उमेदवाराचे काम करणाऱ्या लक्ष्मण उर्फ बाळा नाईक यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेत जिल्हाप्रमुख संजू परब यांनी महायुतीच्या धर्माचा सरळसरळ विश्वासघात केला आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे दोडामार्ग मंडल अध्यक्ष दीपक गवस यांनी केला आहे.
भाजपातून हकालपट्टी झालेल्या अशा व्यक्तीला जिल्हाप्रमुख परब यांनी पक्षात घेतल्याने हे केवळ दिखावूपणाचं नाटक नसून महायुतीच्या पाठीवर वार असल्याचा आरोप गवस यांनी केलाय. युती धर्म तोडलेल्यांनी आता होणाऱ्या संघर्षासाठी सज्ज राहावे, असही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्टपणे म्हणतं शिवसेनेला इशाराच दिलाय.
या पक्ष प्रवेशाबाबत अधिक बोलताना श्री. गवस म्हणाले की, “शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते बाळा नाईक यांचा आज पक्षप्रवेश करण्यात आला. याच बाळा नाईक यांनी विधानसभेत माजी आमदार आणि उबाठा शिवसेनेचे उमेदवार राजन तेली यांच काम केले होते. त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी त्यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत पक्षातून निलंबन केले होते. मग अशा पक्षविरोधी माणसाला महायुती धर्म तोडत शिवसेनेत घेण्याचं धाडस संजू परब कशाच्या जोरावर करतात? याबाबत आमदार दीपक केसरकर हे संजू परब यांना जाब विचारणार का? या प्रवेशाबाबत संजू परब यांचे कान टोचणार का? असा सवाल उपस्थित करत दीपक केसरकर यांनी असेच मौन बाळगलं तर येत्या काळात महायुती धर्मात संघर्ष अटळ आहे असा ईशारा दिलाय. त्याचबरोबर पक्षसंघटना कशी वाढवायची आणि विश्वासघातकांना कसं धडा शिकवायचं हे दाखवण्यासाठी आम्ही तयार आहोत. असेही गवस यांनी आमदार केसरकर यांच्यासह संजू परब यांना सुनावले आहे.