
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यात आता वाढ करण्यात आली असून ही गाडी सोळा डब्यांची असणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.मंत्री नितेश राणेंच्या मागणीनुसार या गाडीत डब्यांची वाढ करण्यात आली आहे.
१९ ऑगस्ट रोजी मंत्री नितेश राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना या संदर्भात पत्र पाठवले होते. मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, रेल्वेमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत.पूर्वी या गाडीला आठ डबे होते, आता अधिक आठ डबे जोडले जाणार असल्याने ही गाडी १६ डब्यांची धावणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासीयांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार आहे. या सोयीमुळे मुंबई-कोकण प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार असून मुंबई ,कोकणासह गोव्यातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.