
कुडाळ : आमदार निलेश राणे यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी बाप्पाकडे साकडे घातले आहे. आमदार झाल्याने कार्यकर्त्यांनी केलेला सोन्याच्या पायाच्या नवस पूर्ण झाला आहे, आता मंत्रीपदाच्या नवसाची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे. निलेश राणे यांनी आज कुडाळ येथे असलेल्या 'सिंधुदुर्गचा राजा' गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले आणि पूजा केली. याप्रसंगी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यापूर्वी कार्यकर्त्यांनी निलेश राणे आमदार व्हावे यासाठी सिंधुदुर्गच्या राजाकडे नवस केला होता. राणे आमदार होताच कार्यकर्त्यांनी सोन्याच्या पायाचा नवस फेडला. सिंधुदुर्गच्या राजाची नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती आहे. त्यामुळे आता मंत्रिपदासाठी केलेला नवस देखील पूर्ण होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जि.प.चे माजी अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, ओंकार तेली व अरविंद करलकर, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, शहर प्रमुख अभी गावडे, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेवक विलास कुडाळकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, चेतन पडते, देवेंद्र नाईक आदींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.










