हिंदू राष्ट्राच्या रक्षणासाठी शिवसंस्कार रुजवा'; मंत्री नितेश राणे

शिवसंस्कारचा भव्य सन्मान सोहळा झाला दिमाखात
Edited by: विनायक गांवस
Published on: October 04, 2025 20:07 PM
views 137  views

सावंतवाडी : हिंदू राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र करण्याचे स्वप्न काहीजण पाहत आहेत. लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद विरोधात मी लढत आहे. त्या लोकांकडून मदरशांमध्ये मुलांना इस्लाम बाबतीत कडवटपणाची शिकवण दिली जात असेल तर आपण आमच्या मुलांवर लहानपणापासूनच शिवसंस्कार करणे काळाची गरज आहे.  हिंदुत्वाचा आपला ज्वलंत इतिहास आपणच मुलांपर्यंत नेऊन हिंदुत्वाचे बाळकडू त्यांना द्यायला हवे. शिव संस्कार च्या माध्यमातून नव्या पिढीला हे शिव विचार देण्याचे कार्य सुरू आहे. त्यामुळे असे कार्य करणाऱ्या संस्थांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. सावंतवाडी येथील शिव संस्कार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. 

सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात शिवसंस्कार आयोजित भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व शिव प्रतिमेस वंदन करून या भव्य सोहळ्याचे उद्घाटन झाले. यावेळी  जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, 'कोकणसाद'चे संपादक संदीप देसाई, शिवसंस्कारचे अध्यक्ष गणेश ठाकुर, डॉ. सोनल लेले, सुधीर थोरात, रूपेश मोरे, अभिजीत राऊळ, पंकज भोसले, भुषण साटम, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, अजय गोंदावळे आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना नितेश राणे यांनी संबोधित केले. प्रखर हिंदुत्ववादी विचार मांडताना ते म्हणाले, आमच्या विचारांना प्रोत्साहन देणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळाव यासाठी कार्यक्रमास उपस्थित राहिलो. शिव संस्कार नाव फार महत्त्वाचे आहे. आपण मुलांना तसेच हिंदू समाजाला कोणता संस्कार देतो हे महत्त्वाचे आहे. बालपणापासून मुलांना किती कडवट बनवतो यावर देशाचं भवितव्य अवलंबून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.  छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य म्हणजे महाराजांनी इस्लामिक आक्रमणांविरोधात दिलेला लढा होता. ज्या इस्लामिक शक्तींनी आपल्या हिंदू धर्मावर हल्ले केले. आपल्या हिंदू देवदेवतांची मंदिरे तोडली, हिंदूंचा छळ केला त्या आक्रमणाच्या विरोधात त्यांनी लढा दिला. त्यामुळे ती लढाई ही हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच होती. त्यांच्या सैन्यात कोणीही मुस्लिम नव्हते. त्यांनी सापांना कधीही दूध पाजले नाही. त्यामुळे आपण देखील आपल्या हिंदू राष्ट्राच्या रक्षणासाठी मनामनात शिवविचार रुजविणे काळाची गरज आहे, असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. 

तसेच जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आज कार्यरत आहे. मात्र, मी हिंदूच्या मतांवर निवडून आलेला आमदार आहे. मोहल्ल्यात मी प्रचाराला सुद्धा गेलो नाही‌‌. त्यामुळे हिंदूंचं हित माझ्यासाठी महत्वाचं आहे. हिंदू्च्या मागे उभं राहणं मी माझं कर्तव्य समजतो. त्यामुळेच  शिवसंस्कारसारखी संस्था हिंदू समाजासाठी व येथील मुलांसाठी अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम राबवत असेल तर हिंदू म्हणून आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आपले कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले. तर, हिंदू राष्ट्राबद्दल बोलताना आम्ही 'टॅक्स फ्री ' आहोत. हिंदू राष्ट्रात आपण हिंदूच हीत बोलणार नाही तर ते पाकिस्तानला बोलायचं का ? असा सवाल त्यांनी केला. हिंदू म्हणून हिंदूंचे विचार आम्ही ठामपणे मांडणार, 'आय लव्ह महादेव ' चा नारा देणार असून आज इस्लामच्या नावाने जो काही दंगा सुरू आहे तो रोखण्यासाठी हिंदूंनी पुढे येणे आवश्यक आहे. सिंधुदुर्गात तर अशा प्रकारचे जिहादी मानसिकतेचे कोणतेही फलक लावू देणार नाही, तेवढी हिंमत कोण करणार नाही असेही विधान त्यांनी केले. 

दरम्यान, या सन्मान सोहळ्यात  सुधीर थारात (श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, शिवशंभू विचार मंच, पुणे), रणजित हिर्लेकर (कोकण इतिहास परिषद, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष) आणि प्रथमेश खामकर (युवा इतिहास अभ्यासक, पुणे) यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच सन्मान सोहळ्यात तळवडे जनता विद्यालयाचे अध्यापक विजय सोनवणे, मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर यांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहारचा चिमुकला विद्यार्थी अर्णव अभिजीत राऊळ याने आपल्या पहाडी आवाजात 'गारद' सादर केली. त्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह सर्वच मान्यवरांनी व उपस्थितांनी कौतुक केले. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष गणेश ठाकूर यांनी शिव संस्कार संस्थेच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. डॉ. सोनल लेले त्यांनीही शिवसंस्कार संस्थेच्या एकूणच जडघडणीचा इतिहास तसेच कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 

जेष्ठ इतिहास संशोधक शिवचरित्रकार गजानन मेहंदळे यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांचा जीवनपट उलगडण्यात आला. शिव संस्कार रुजविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य व एकूणच त्यांच्या महानकार्याचा यावेळी आढावा घेण्यात आला. सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंग असलेल्या अफजलखान वध यावर आधारित 'नरसिंह शिवराय ' हे शिव गणेश प्रोडक्शन मुंबई निर्मित व  गणेश ठाकूर लिखित दिग्दर्शित व अभिनित ऐतिहासिक नाटक सादर करण्यात आले. यावेळी इतिहास प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.