
चिपळूण : लो. टिळक स्मारक वाचन मंदिराच्या रामभाऊ साठे संग्रहालयात कोकणच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देणारी आणखी एक मोलाची भर पडली आहे. ब्रह्मदेशाचा राजा थिबा याने दिलेला ‘मिरर हॅट स्टँड’ आता संग्रहालयात पाहता येणार आहे. ही अमूल्य वस्तू ज्येष्ठ विधिज्ञ कै. बापूसाहेब परुळेकर यांचे चिरंजीव, विधिज्ञ बाबासाहेब परुळेकर यांनी लोटिस्मा संग्रहालयास भेट दिली. ब्रिटिशांनी ब्रह्मदेशातून राजा थिबाला १६ एप्रिल १८८६ रोजी रत्नागिरी येथे निर्वासित म्हणून आणले होते. त्यांचे निधन १९१६ साली याच ठिकाणी झाले. रत्नागिरीतील वास्तव्यात राजा थिबा यांना कायदेशीर सल्ला रावबहादूर लक्षण विष्णु परुळेकर देत असत. त्यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या थिबा राजाने परुळेकर कुटुंबास अनेक अमूल्य भेटवस्तू दिल्या होत्या. त्यातीलच एक ‘मिरर हॅट स्टँड’ आज संग्रहालयाची शोभा वाढवत आहे.
संग्रहालयाच्या समृद्धीसाठी परुळेकर कुटुंबीयांनी दिलेल्या या ऐतिहासिक ठेव्याबद्दल लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांनी त्यांचे आभार मानले. “रत्नागिरीच्या इतिहासात थिबा राजा हा एक अविभाज्य घटक आहे. त्यांनी वापरलेल्या वस्तूंमुळे संग्रहालयाची श्रीमंती निश्चितच वाढणार आहे. आम्ही परुळेकर कुटुंबाचे मनःपूर्वक ऋणी आहोत,” असे डॉ. जाधव यांनी नमूद केले. या प्रसंगी विधिज्ञ अमेय परुळेकर, लोटिस्माचे सहकार्यवाह श्री. विनायक ओक आदी मान्यवर उपस्थित होते.