
चिपळूण : “ग्रामीण भागातील लोकांची सेवा करण्यामध्ये खरा आनंद आणि परमार्थ मिळतो,” असे प्रतिपादन आयुर्वेदिक आधार चॅरिटेबल ट्रस्ट चिपळूणच्या अध्यक्षा डॉ. वर्षा कुडचडकर यांनी केले. जांभराई चौथा टप्पा परिसरातील कोळकेवाडी येथे प्रयोग भूमी शिक्षण केंद्र आणि आयुर्वेदिक आधार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ११ ऑगस्ट २०२५ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी डॉ. कुडचडकर बोलत होत्या. यावेळी चंद्रशेखर कुडचडकर, संचित कुडचडकर, श्रुती हळदणकर, सागर खोडदे, आकांक्षा खोडदे, सचिन वाशीवाले, प्रियंका वाशीवाले, संदीप शिवगण, नितेश खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात डॉ. कुडचडकर यांनी आयुर्वेदाच्या सुमारे ३,००० वर्षांच्या व्यापक आणि सखोल परंपरेविषयी मार्गदर्शन केले. तसेच हर्बल कायरोप्रॅक्टिक उपचारांबाबत माहिती दिली. शिबिरात रक्तगट तपासणी, टी.टी. इंजेक्शन यांसारख्या तपासण्या मोफत केल्या गेल्या. विविध रोगांवर उपचार, मार्गदर्शन आणि मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. शिबिरानंतर वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाचा परिसरातील सुमारे ५० ते ५५ रुग्णांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी चिपळूण येथील मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संदीप शिवगण यांनी उपस्थितांचे आभार मानले.