
कुडाळ : ऐन भात कापणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात कोकणात, विशेषत: कुडाळ तालुक्यात, झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजावर अस्मानी संकट उभे ठाकले आहे. हातातोंडाशी आलेले भात पीक वाया जाण्याची भीती असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कुडाळ तालुक्यातील सर्वच गावांमध्ये भात कापणीने जोर धरला होता. तयार झालेले पीक शेतातून सुरक्षित घरी आणण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस मेहनत घेत असताना, अचानक कोसळलेल्या या अवकाळी पावसाने त्यांच्या कष्टावर पाणी फिरवण्याची वेळ आली आहे. कापलेले भात शेतात भिजल्याने आणि उभे पीकही पावसामुळे नुकसानग्रस्त होण्याची शक्यता असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
कोकणातील शेतकरी अनेक नैसर्गिक संकटांवर मात करत शेती करत आला आहे. मात्र, भात कापणीच्या हंगामातील हा पाऊस शेतकऱ्याचे मोठे नुकसान करणारा ठरण्याची चिन्हे आहेत.
शासनाच्या मदतीची प्रतीक्षा
अवकाळी पावसामुळे झालेल्या भात पीक नुकसानीची शासनाने तातडीने दखल घ्यावी, पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. या अस्मानी संकटात शासनाकडून नेमकी काय मदत मिळणार, याकडे कोकणातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.











