सावंतवाडी विद्या सेवक पतपेढीवर सहकार समृध्दी पॅनेलचे वर्चस्व!

11 पैकी तब्बल 8 उमेदवार विजयी
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 01, 2023 19:22 PM
views 711  views

सावंतवाडी : येथील विद्या सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित सावंतवाडी या पतसंस्थेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत पॅनेल प्रमुख जयवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार समृद्धी पॅनलने विद्या सेवक परिवर्तन पॅनेलचा धुव्वा उडवत ११ पैकी तब्बल आठ जागा जिंकल्या व एक हाती सत्ता काबीज केली आहे.

 रविवारी शहरातील आरपीडी महाविद्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. अत्यंत शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात सदर निवडणूक संपन्न झाली. यावेळी २४५ मतदारांपैकी तब्बल २३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत सहकार समृद्धी पॅनेलला विजयी केले. सदर निवडणुकीत अगोदरच ११ पैकी तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. यात सहकार समृद्धी पॅनलच्या हर्षाली खानविलकर, तर  विद्या सेवक परिवर्तन पॅनेलचे अनुष्का गावडे व हंबीरराव अडकुरकर हे बिनविरोध निवडून आले होते.

 दरम्यान रविवारी संपन्न झालेल्या निवडणुकीत सहकार समृद्धी पॅनेलचे ८ पैकी तब्बल ७ उमेदवारांनी बाजी मारली यात. सर्वाधिक मते पांडुरंग काकतकर (१३६ मते) मिळवत विजयी पताका झळकावली. सहकार समृद्धी पॅनेलचे गोविंद कानसे, जयवंत पाटील, विठ्ठल सावंत, राजेश गुडेकर, शरद जाधव, प्रा. पवन वनवे यांनी सहकार समृद्धी पॅनेलतर्फे विजयश्री खेचून आणली. तर विद्या सेवक परिवर्तन पॅनेलचे रामचंद्र घावरे ११४ मते घेत विजयी झाले. 

विजयानंतर सहकार समृद्धी पॅनेलच्या विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष केला व आर पी डी महाविद्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता.यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्र येत जल्लोषपूर्ण वातावरणात पॅनेल प्रमुख जयवंत पाटील व सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन केले. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल क्षीरसागर यांनी काम पाहिले.