
मालवण: "ज्येष्ठांचे आशीर्वाद बाजारात विकत मिळत नाहीत. त्यामुळे आज होणारे तुमचे कौतुक म्हणजे आशीर्वाद आहेत. नेहमी सद्गुणांचा अंगीकार करा. अभ्यासात यश मिळवताना चांगले नागरिक सुद्धा बना," असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापिका सौ. श्रुती गोगटे यांनी केले. त्या हडी येथे आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या वार्षिक गुणगौरव कार्यक्रमात बोलत होत्या. मुलांनी स्वतःबरोबरच गावाचे नाव रोशन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
फेस्कॉन संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने गावातील ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा हा वार्षिक गुणगौरव कार्यक्रम हडी जठारवाडी शाळेत पार पडला. या कार्यक्रमाला सरपंच प्रकाश तोंडवळकर, माजी सभापती उदय परब, हडी ग्रामस्थ मंडळ मुंबईचे कोषाध्यक्ष श्री. साळकर, संघाचे अध्यक्ष देविदास सुर्वे, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, मुख्याध्यापक सी.डी. जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी हडी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांच्या सहकार्याने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून शैक्षणिक साहित्य देण्यात आले. संघाचे सल्लागार चंद्रकांत पाटकर यांनी या सहकार्याबद्दल आभार मानले आणि भविष्यातही असेच सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात बोलताना सरपंच प्रकाश तोंडवळकर म्हणाले की, "ज्येष्ठ नागरिक ही आपल्या गावची संपत्ती आहे आणि त्यांचा सन्मान करणे आवश्यक आहे. सरपंच म्हणून मी नेहमी ज्येष्ठांच्या पाठीशी उभा राहीन." माजी सभापती उदय परब यांनी जेष्ठ नागरिक संघाच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, "जेष्ठ नागरिक दरवर्षी त्याच उत्साहाने हा कार्यक्रम राबवतात. त्यांची एकजूट कायम राहावी." जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष देविदास सुर्वे यांनी सांगितले की, हा संघ नेहमीच गावातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहील. या कार्यक्रमात संघाचे सल्लागार चंद्रकांत पाटकर यांचा त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी सी. डी. जाधव, दिनेश सुर्वे, श्री साळकर,किशोर नरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपाध्यक्ष आरती कदम, सदस्य प्रभाकर चिंदरकर, रमेश कावले, दिनकर सुर्वे, नंदकुमार पाटील, सत्यवान सुर्वे, महादेव सुर्वे, गणू परब,अनंत घाडी, उमेश हडकर, प्रभाकर कांदळगावकर आदींसह हडी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन चंद्रकांत पाटकर यांनी केले.