
सिंधुदुर्गनगरी : गणपतीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 16 ठिकाणी वैद्यकीय पथके नेमण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ रहिवासी मात्र ते नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे, गोवा आदि शहरांमध्ये राहतात सध्या पावसाळ्याचे दिवस असून या कालावधीत विविध साथीच्यातापसरीचे रुग्ण आढळून येतात. जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांमध्ये हिवताप, डेंग्यू, लेप्टोस्पायरसिस आदी जोखीमग्रस्त तापसरी असण्याची शक्यता असते. या रोगांचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बस स्थानके, रेल्वे स्टेशन,चेक पोस्ट या ठिकाणी 23 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत उपचार व निदान पथकांची स्थापना करण्यात येते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 16 ठिकाणी अशा पथकांची स्थापना करण्यात आली असून, ही सर्व पथके 23 ऑगस्ट पासून कार्यरत होणार आहेत. यामध्ये कणकवली, सावंतवाडी, कुडाळ, वैभववाडी, सिंधुदुर्गनगरी ही रेल्वे स्टेशन. तसेच मालवण,वेंगुर्ला, कणकवली, देवगड, सावंतवाडी, कुडाळ या एसटी स्टँड वर त्याचप्रमाणे दोडामार्ग, आंबोली, फोंडाघाट, खारेपाटण आणि करूळ या चेक पोस्टवर ही पथके तैनात असणार आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची या ठिकाणी तपासणी करून यामध्ये कुणी तापसरीचा रुग्ण असल्यास त्याच्यावर उपचार करून जिल्ह्यात पाठविण्यात येणार आहे.