दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी ‘जागतिक पांढरी काठी दिन’

कोकण संस्थेकडून प्रेरणादायी उपक्रम
Edited by:
Published on: October 11, 2025 19:37 PM
views 136  views

सावंतवाडी : १५ ऑक्टोबरला साजरा केला जाणारा ‘जागतिक पांढरी काठी दिन’ हा दृष्टिहीन आणि अपंग व्यक्तींसाठी सुलभता, स्वावलंबन आणि समावेशकतेचा संदेश देणारा दिवस आहे. या निमित्ताने कोकण संस्थेच्या वतीने सावंतवाडी येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात ६० दृष्टिहीन व्यक्तींना पांढरी काठी भेट म्हणून देण्यात आली. अंध व्यक्तींना स्वातंत्र्याने फिरता यावे, आत्मविश्वास वाढावा आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी व्हाव्यात, या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी सांगितले.

कुबळल यांनी सांगितले की, “पांढरी काठी ही केवळ अंधत्वाची खूण नसून आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. योग्य साधनं आणि समाजाचा आधार मिळाल्यास दृष्टिहीन व्यक्तीदेखील स्वावलंबीपणे जगू शकतात,” असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून त्यांनी दिला गेला.

अंध व्यक्तींना दैनंदिन जीवनात रस्त्यावरील अडथळे, वाहतुकीचा धोका आणि अपघातांची भीती यांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर रिफ्लेक्टीव्ह पांढरी काठी त्यांना केवळ चालण्यात मदत करत नाही, तर रात्रीच्या अंधारात इतर वाहनांना सहज दिसल्याने अपघातांची शक्यता देखील कमी करते.

या कार्यक्रमात सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सिंधुदुर्ग पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ, रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, रूपा मुद्राळे, प्रा. रुपेश पाटील, तसेच साईकृपा अपंग बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल चे अध्यक्ष अनिल शिंगाडे, सदस्य प्रकाश वाघ, ऑन कॉल रक्तदातेचे सचिव बबली गवंडी, कोकण संस्थेचे रिजनल मॅनेजर प्रथमेश सावंत आणि पत्रकार साबाजी परब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान यावेळी सामाजिक कार्यकर्ते विशाल परब यांचा वाढदिवस सर्व दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. त्यांच्या उत्तम आरोग्य आणि समृद्ध जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर शिर्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रथमेश सावंत यांनी मानले.

या उपक्रमासाठी अवंती गवस, हनुमंत गवस, वैष्णवी म्हाडगूत, ऋचा पेडणेकर, गौरी आडेलकर, पद्माकर शेटकर आणि रोशनी चारी यांनी विशेष योगदान दिले.