
कुडाळ : आमदार निलेश राणे रात्रंदिवस सिंधुदुर्गसाठी काम करत असून, त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन शिवसेना नेते दत्ता सामंत यांनी कुडाळ येथे केले. नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत राणे यांच्या कामाची झलक सर्वांनी पाहिली, असेही ते म्हणाले.
‘मी आज जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलो तरी, मी नारायण राणे साहेबांचा कार्यकर्ता आहे. आम्हाला राणे साहेबांनी घडवले याचा आम्हाला अभिमान आहे,’ असे सांगत सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘मला कोणत्याही पदाची लालसा नाही. राणे साहेबांनी दिलेला आदेश पाळणे हाच आमचा धर्म आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्गचा विकास हीच आमदारांची भावना
दत्ता सामंत म्हणाले की, ‘निलेश राणे हे असे आमदार आहेत ज्यांना सिंधुदुर्गमधून काहीही न्यायचे नाही. उलट, स्वतःच्या खिशातून सिंधुदुर्गच्या विकासासाठी काहीतरी झाले पाहिजे आणि आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, अशी त्यांची भावना आहे.’ निलेश राणे यांच्या कामाचा अनुभव आणि विधिमंडळातील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे हे त्यांच्या कामाची पोचपावती लवकरच देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
'सक्षम स्पर्धक द्यावा ही गणरायाकडे प्रार्थना'
‘महायुतीमध्ये कायम सलोखा राहावा आणि त्यात कोणतीही कटुता येऊ नये, यासाठी मी गणरायाकडे प्रार्थना करतो,’ असे सांगत सामंत यांनी, ‘आम्हाला सक्षम स्पर्धक मिळावा, कारण सक्षम स्पर्धक असेल तरच काम करण्याची ऊर्जा मिळते,’ असे म्हटले. राणे कुटुंबीयांवर ज्यांनी आरोप केले, त्यांना गणपती बाप्पानेच त्यांची जागा दाखवून दिली, असेही ते म्हणाले.