LIVE UPDATES

‘स्टॉप डायरिया अभियान’ची जिल्हाभर सुरुवात

१६ जून ते ३१ जुलैदरम्यान जनजागृती, पाणी तपासणी व स्वच्छतेवर भर; अतिसारमुक्त सिंधुदुर्गासाठी सर्वांच्या सहभागाचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 24, 2026 18:36 PM
views 16  views

सिंधुदुर्गनगरी : पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे अतिसारजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात ‘स्टॉप डायरिया अभियान २०२६’ राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली.

अतिसार हा विशेषतः पाच वर्षांखालील बालकांसाठी जीवघेणा ठरू शकणारा आजार असून सुरक्षित पिण्याचे पाणी, साबणाने हात धुण्याची सवय, परिसर स्वच्छता आणि योग्य स्वच्छताविषयक पद्धतींचा अवलंब केल्यास त्यावर प्रभावी नियंत्रण मिळविता येते. नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक बळकट करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग, पाणी व स्वच्छता विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच विविध सामाजिक संस्थांच्या समन्वयातून हे अभियान राबविले जाणार आहे. अभियानांतर्गत तालुका व ग्रामस्तरावर बैठका आयोजित करण्यात येणार असून ग्रामपंचायती, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्या, शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना अभियानाची माहिती देण्यात येणार आहे.

गावनिहाय पाणी गुणवत्तेचे परीक्षण करून पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची नियमित तपासणी केली जाणार आहे. तसेच विद्यार्थी आणि स्वयंसेवकांना फिल्ड टेस्ट किटच्या साहाय्याने पाणी तपासणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेऊन गळती असलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती, पाणी साठवण टाक्यांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण आणि नियमित क्लोरीनीकरणावर विशेष भर दिला जाणार आहे.

या अभियानादरम्यान साबणाने हात धुण्याचे महत्त्व, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा वापर, अन्न हाताळताना घ्यावयाची काळजी तसेच अतिसार प्रतिबंधाबाबत व्यापक जनजागृती केली जाणार आहे. गावस्तरावर स्वच्छता मोहिमा राबवून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि सुरक्षित कचरा हाताळणीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक स्थितीची शाश्वतता राखण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

स्थानिक समुदाय, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत सदस्य, अंमलबजावणी सहाय्य संस्था (आयएसए) तसेच विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून हे अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असून नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणी गुणवत्तेशी संबंधित तक्रारींचा नियमित आढावा घेत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

अतिसारमुक्त व निरोगी सिंधुदुर्गसाठी पुढे या!- "सुरक्षित पाणी, स्वच्छता आणि चांगल्या सवयींच्या माध्यमातून अतिसारमुक्त व निरोगी सिंधुदुर्ग जिल्हा घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा. प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय असून नागरिकांच्या सहकार्यामुळे हे अभियान अधिक प्रभावी ठरेल."

— रविंद्र खेबुडकर

मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग