LIVE UPDATES

सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद-२०२६’

शासकीय योजनांसह ‘Bappa.org’ची माहिती
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 22, 2026 11:50 AM
views 26  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : सावंतवाडी येथील सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आवारात ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. 

विशेषतः महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत, पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आणि उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९०६ मध्ये झाली असून, १२१ व्या वर्षात पदार्पण केलेल्या या मंडळाकडून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या उत्सवाचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यासाठी ‘Bappa.org’ पोर्टलबाबतही यावेळी माहिती देण्यात आली. 

नागरिकांनी या पोर्टलवर गणेशोत्सवाशी संबंधित कथा, पारंपरिक पाककृती (रेसिपी), उत्सवाचे छायाचित्रे आणि व्हिडिओ अपलोड करून आपल्या उत्सवाची डिजिटल नोंद करावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे, अधीक्षक बी. जी. काटकर, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष अमरनाथ सावंत, उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र भाट यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळांच्या व्यासपीठाचा उपयोग शासकीय योजना आणि उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी करण्यात येत आहे. यावेळी सहभागाबद्दल मंडळास सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.