LIVE UPDATES

‘कोकणदीप’चा मानाचा गौरव सोहळा

डॉ. सुकृत खांडेकर, प्रवीण घाग - बाळासाहेब तोरसकर 'कोकणदीप जीवन गौरव'ने सन्मानित
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 16, 2026 13:38 PM
views 50  views

24 व्या वर्धापन दिनाचं निमित्त

मुंबई  : दैनिक सामना या शिवसेनेच्या मुखपत्रावर पीएचडी करुन डॉक्टरेट मिळविणारे ज्येष्ठ संपादक डॉ. सुकृत खांडेकर, गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री. प्रवीण घाग आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बाळासाहेब तोरसकर यांना ‘कोकणदीप जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. ‘कोकणदीप’ मासिकाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त या राज्यस्तरीय पुरस्कारांचे  वितरण १४ जून २०२६ रोजी दादर (पूर्व), मुंबई येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दापोली विधानसभेचे शिवसेना संपर्क प्रमुख  सुधीर कदम होते. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी विनय शेडगे तसेच समाजभूषण पुरस्कार विजेते संतोष परब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र अशोक नागरगोजे, वन्यवाणी फाऊंडेशनचे संस्थापक तसेच ‘वाइल्ड लाईफ प्लेज’ या नवीन नाट्य प्रकाराचे निर्माते मकरंद सावंत, कवी अशोक पुंडलिक ऊर्फ भाई नार्वेकर आणि ॲड . निलेश राऊत यांनाही ‘कोकणदीप गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते व युवा नेतृत्व प्रविण लाड, कवी राजेंद्र चौधरी, प्रविण महादेव घाटविलकर महाराज तसेच ज्येष्ठ कवी विलास देवळेकर यांना ‘कोकण भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तर कुमार रोशन मोडकळे, पत्रकार सोनल महाडिक, उद्योजक चंद्रकांत पांढरे आणि सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार शशिकांत सावंत यांचा ‘कोकणरत्न पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कोकणदीप मासिकाचे आणि प्रभू अग्रहारकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याचे आयोजन ‘कोकणदीप’ प्रकाशनाचे संस्थापक संपादक श्री. दिलीप शेडगे आणि उपसंपादक श्री. विद्याधर शेडगे यांनी केले होते. कार्यक्रमाला माजी शिक्षणाधिकारी डॉ. जीवबा केळुसकर, महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. प्रकाश पाटकर, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. मारुती विश्वासराव, महाराष्ट्र मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर, समाजसेवक रणजित जाधव, रविंद्र साळवी, रविंद्र बैकर, नितिन सुखदरे, दत्ता खंदारे, संताजी शेडगे, यांच्यासह साहित्य, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद महाडिक यांनी केले.