महिलांची 17 सप्टेंबरला आरोग्य तपासणी

स्वस्थ नारी, सशक्त परिवार
Edited by: मनोज पवार
Published on: September 16, 2025 15:17 PM
views 35  views

चिपळूण : केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ या विशेष अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान महिलांच्या आरोग्य तपासणीसह उपचार आणि आवश्यक समुपदेशन सेवा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत.  17 सप्टेंबर  रोजी  जिल्हा रुग्णालय व  उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन  होणार आहे.  यावेळी हिरकणी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्यविषयी जागृती केली जाणार आहे. त्याचबरोबर नाटुकलीच्या माध्यमातूनही जागृती केली जाईल.

सर्व नागरिकांनी आपल्या घरातील सर्व महिला व मातांना या मोहिमेत सक्रीय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.

या अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालय, 3 उपजिल्हा रुग्णालय, 9 ग्रामीण रुग्णालये, 68 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 378 उपकेंद्रांमध्ये मोफत शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.   यामुळे महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रोत्साहन मिळेल, गंभीर आजारांचे लवकर निदान होऊन योग्य वेळी उपचार सुरू करता येतील. 

ग्रामीण व शहरी भागातील महिलांना त्यांच्या आरोग्यविषयी शिक्षित करणे, जागरूक करणे आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.  स्तन व गर्भाशय कर्करोगाची प्राथमिक तपासणी, रक्तदाब व मधुमेहाची तपासणी, रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी, असंसर्गजन्य आजार (एनसीडी) तपासणी, असुरक्षित महिलांसाठी क्षयरोग तपासणी, सामान्य आरोग्य समस्या यावर उपचार व समुपदेशन करण्यात येणार आहे. 

किशोरवयीन मुली व महिलांसाठी अशक्तपणा तपासणी, गर्भवती महिलांसाठी प्रसूतपूर्व काळजी तपासणी, गर्भधारणादरम्यान पोषण व काळजी समुपदेशन, माता-बाल संरक्षण कार्डचे वितरण, बालकांना लसीकरण सेवा, मासिक पाळी स्वच्छता व पोषण विषयक जनजागृती, रक्तदान मोहिम इत्यादी सेवा देण्यात येणार आहेत. 

महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना  व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना नोंदणीसाठी आधारकार्ड रेशनकार्ड व आधारला लिंक असणारा मोबाईल तसेच आयुष्यमान वय वंदना कार्ड नोंदणी साठी  आधारकार्ड, आधारला लिंक असणारा मोबाईल असावा.