
आपल्या रोजच्या आहारात दूध एक महत्त्वाचा घटक असतो. कॅल्शियम, ड जीवनसत्त्व आणि प्रथिने यांचे उत्तम स्रोत असूनही कोलेस्टेरॉलच्या निकषावर दूध प्यावे की नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर थेट ’हो’ किंवा ’नाही’ असे न देता, दुधाचा प्रकार आणि त्यातील चरबीचे प्रमाण लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते.
संपूर्ण किंवा फुलफॅट दूध म्हणजे पूर्ण चरबी असलेले दूध. यात संतृप्त चरबी (सॅच्युरेटेड फॅट्स) जास्त प्रमाणात असते. ही संतृप्त चरबी शरीरातील ‘एलडीएल’ म्हणजेच वाईट कोलेस्टेरॉल वाढवते आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. एक कप फुलफॅट दुधात सुमारे 24 ते 35 मिलिग्रॅम कोलेस्टेरॉल असते. त्यामुळे ज्यांचे कोलेस्टेरॉल आधीपासूनच जास्त आहे, अशा व्यक्तींनी असे दूध मर्यादित प्रमाणातच प्यावे.
लो फॅट किंवा स्किम दूध (चरबीविरहित) : यामध्ये संतृप्त चरबी आणि कोलेस्टेरॉल दोन्हीचे प्रमाण फारच कमी असते. एक कप स्किम दुधात फक्त 5 मिलिग्रॅम कोलेस्टेरॉल असते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरतो.
बाजारात मिळणारे आल्मंड मिल्क, सोया दूध आणि ओट्स दूध हे पर्याय कोलेस्टेरॉलमुक्त असल्याचा दावा केला जातो; परंतु त्यांच्या निर्मितीतील अनेक प्रक्रिया या नव्या समस्या उद्भवणार्या असू शकतात. आजकाल बाजारात ओमेगा-3 फॅटी अॅसिडस् किंवा प्लांट स्टेरोल्स मिसळलेले दूधदेखील मिळते. हे हृदयासाठी अधिक फायदेशीर असल्याचा दावा केला जातो.
या सर्वांपेक्षा देशी गायीचे दूध हा सर्वांत उत्तम पर्याय ठरतो. कोलेस्टेरॉल, चरबी यांसारख्या आधुनिक काळात भीती बनून राहिलेल्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर रोज एक ग्लास देशी गायीचे दूध प्राशन करावे. यामध्ये साखर, पावडरी काहीही न मिसळता हे दूध प्यावे. बदलत्या जीवनशैलीमुळे शरारीची होणारी झीज भरून काढण्यासाठी हे दूध उपरोक्त सर्व पर्यायांपेक्षा लाभदायक ठरते. याखेरीज भरपूर व्यायाम करणार्यांनी, शारीरिक कष्टाची कामे करणार्यांनी, वाढत्या वयातील मुलामुलींनी म्हशीचे ताजे दूध प्यायल्यास त्यातूनही बर्याच प्रमाणात पोषक द्रव्ये शरीराला मिळतात.