वैभववाडी : तालुक्यात तापसरीने पुन्हा डोकेवर काढले आहे. डेंग्यू, टॉयफाईड आणि व्हायरल तापसरीच्या रुग्णात मोठी वाढ झाली आहे. तालुक्यातील सरकारी रूग्णालयांसह खाजगी दवाखान्यांना सध्या जत्रेचे स्वरूप आले आहे. मात्र असे असले तरी आरोग्य विभाग सुशेगाद आहे. डेंग्यूच्या रूग्णांची निश्चित आकडेवारी देखील या विभागाकडे नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नाही आहे.
तालुक्यात सध्या तापसरीचे शेकडो रूग्ण आढळुन येत आहे.गेले महिनाभर तापसरीने धुमाकुळ घातला आहे.येथील ग्रामीण रूग्णालय, उंबर्डे प्राथमीक आरोग्य केंद्र,सडुरे प्राथमीक आरोग्य केंद्रामध्ये दररोज तापसरीचे शेकडो रूग्ण तपासणीकरीता येत आहेत. यामध्ये डेंग्यू आणि टॉयफाईड रूग्णांचे प्रमाण देखील आहे. वैभववाडी शहर तर डेंगीचे हॉटस्पॉट बनत चालले आहे.सध्या शासकीय रूग्णालयांमध्ये डेंग्यूच्या रूग्णांची अवघी सात अशी नोंद असुन डेंग्यूसदृश्य सहा ते सात रूग्ण आहेत.मात्र प्रत्यक्षात ही आकडेवारी खुप मोठी असण्याची शक्यता आहे.७० टक्केपेक्षा अधिक रूग्ण खाजगी दवाखान्यांमध्ये तपासणी करून उपचार घेतात.तेथे आढळुन आलेले डेंग्यूसदृश्य रूग्ण हे खाजगीच दवाखान्यामध्ये किंवा अन्य शहरातील रूग्णालयांमध्ये दाखल होतात.
वैभववाडी शहरात डेंग्यूचे रूग्ण सापडण्याचे प्रमाण दिवसेदिंवस वाढत आहे.मात्र आरोग्य विभाग सुशेगाद असल्याचे चित्र आहे.प्रतिबंधात्मक ठोस उपाययोजना शहरात होताना दिसत नाही. शहरातील अनेक भागात डबकी,गटारांमध्ये सांडपाणी साचल्याचे चित्र आहे.या पाण्याचा निचरा करण्यासाठी काहीही उपाययोजना नाहीत. त्यामुळे डेंगीला आळा घालणे अशक्य होत आहे.
याबाबत ग्रामीण रूग्णालयाचे डॉ विवेक साखळकर यांना माहिती विचारली असता.या रुग्णालयात डेंग्यूच्या पाच रूग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय काही रूग्ण टॉयफाईडचे आहेत.सर्वाची प्रकृती उत्तम आहे.काहीचे नमुने घेतलेले आहेत. त्यांचा अहवाल अजुन आलेला नाही असं डॉ.साखळकर यांनी सांगितले.तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, तालुक्यात बदलत्या वातावरणामुळे तापसरीचे रूग्ण अधिक आहेत.मात्र डेंग्यूच्या रूग्णांचे प्रमाण कमी आहे.सद्धयस्थितीत डेंग्यूचा एकही रुग्ण नाही. ज्या भागात डेंग्यूचे रूग्ण आढळुन येत आहेत .त्याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य विभागाकडुन केल्या जात आहेत. काही भागात टॉयफाईडचे रूग्ण आहेत तेथे प्रतिबंधात्मक औषधे दिलेली आहेत असं सांगितले.