समस्या सोडवा, अन्यथा आंदोलन करणारच

उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत सत्यशोधक संघटनेचे ऍड. सुदीप कांबळे यांचा इशारा
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 07, 2025 15:59 PM
views 44  views

कणकवली : उपजिल्हा रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे याठिकाणी उपचार घेण्यासाठी येणाºया रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याने जिल्हयाबाहेरील शासकीय रुग्णालये किंवा जिल्हयातील खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. उपजिल्हा रुग्णालयातील बिघडलेली आरोग्य व्यवस्था १५ आॅगस्टपूर्वी सुधारावी, तसे न झाल्यास सत्यशोधक सेक्युलर फ्रंट उपजिल्हा रुग्णालयासमोर १५ ऑगस्टला उपोषण करणारच, असा इशारा फ्रंटचे अध्यक्ष अ‍ॅड. सुदीप कांबळे यांनी जिल्हा रुग्णालयाचे निवासी अधिकारी डॉ. सुबोध इंगळे यांच्याशी चर्चा करताना दिला. यावेळी कांबळे यांनी त्यांच्यासमोर रुग्णालयातील समस्यांचा पाढा वाचला. 

शासनाचा आरोग्य विभाग शासकीय रुग्णालयांत येणाºया रुग्णांवर चांगले उपचार मिळावे, यासाठी कोट्यवधीचा रुपये खर्च करीत आहे. मात्र, जिल्हयातील सर्वच शासकीय रुग्णालयांची आरोग्य व्यवस्था बिघडल्यामुळे याठिकाणी येणाºया रुग्णांना 'रेफर'चा सल्ला दिला जात आहे, ही बाब त्यांनी निदर्शनास आणून रुग्णालये अधिकारी व कर्मचारी यांना केवळ पगार देण्यासाठी आहेत का?असा खडा सवाल केला. शासकीय रुग्णालयांत आलेल्या रुग्णांना जिल्हयाबाहेर किंवा खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागणार नाही. याकरिता उपजिल्हा रुग्णालयासह सर्वच रुग्णालयांची आरोग्य व्यवस्था सदृढ करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर उपजिल्हा रुग्णालयातील ज्या-ज्या समस्या आहेत, त्यात १५ आॅगस्टपूर्वी सोडविण्यात येतील, असे आश्वासन डॉ. इंगळे यांनी दिले.

उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत व रुग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळत नसल्याबाबत सत्यशोधक सेक्युलर फ्रंकचे अध्यक्ष अ‍ॅड. सुदीप कांबळे यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन १५ आॅगस्ट रोजी उपजिल्हा रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यापार्श्वभूमीवर अ‍ॅड. सुदीप कांबळे यांना गुरुवारी जिल्हा निवासी आरोग्य अधिकारी डॉ. इंगळे यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांच्या दालनात चर्चेसाठी बोलवले होते. यावेळी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, डॉ. सचिन डोंगरे, प्रशांत बुचडे, फ्रंटचे संघटक सचिन कासले आदी उपस्थित होते.

उपजिल्हा रुग्णालयात हाडांच्या रुग्णांची हेळसांड होत असून त्याची हेळसांड होऊ नये याकरिता यंत्र सामुग्री व २४ तास तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असावेत. रुग्णालयात पदभरती झालेले डॉक्टर रजेवर असतात, ते सर्व डॉक्टर सेवेत उपलब्ध असावेत. सोनोग्राफीसाठी रेडिओलॉजिस्ट तात्काळ उपलब्ध करून द्यावा, रुग्णालयात मिनी रक्तपेढी उपलब्ध व्हावी, बाल रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष हवा यासह अन्य मागण्या कांबळे यांनी डॉ. इंगळे यांच्यासमोर केल्या. 

'वन टू वन' समस्येवर इंगळे यांनी कांबळे यांच्या सविस्तर चर्चा करीत, १४ आॅगस्टपर्यंत या समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतरण झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात असणारी यंत्रणा कुठे गेली याबाबत कांबळे यांनी विचारणा केली. हाडांच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांवर वेगळीच उपचार होत नाही, याचे नेमके कारण काय असा सवाल कांबळे यांनी केला. रुग्णालयात दोन आॅथोस्पेशलिस्ट डॉक्टर आहेत. मात्र, नियोजनाअभावी रुग्णांवर उपचार होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. यापुढील काळात हाडांच्या रुग्णांची उपचाराअभावी हेळसांड होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे इंगळे यांनी सांगितले. 

रेडिओलॉजिस्ट नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत ही परिस्थिती आहे. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयात रेडिओलॉजिस्ट डॉ. रुपेश जाधव आहेत. उपजिल्हा रुग्णालयात आठवडयातून तीन दिवस याठिकाणी रुग्णांची तपासणी करण्यासाठी पाठविण्याचे नियोजन करू, असे त्यांनी सांगितले. रुग्णालयात मिनी रक्तपेढी आहे. या पुढील काळात रक्तपेढीत किती रक्तसाठा आहे, त्याची माहिती डॅशबोर्डवर लावली जाईल. एनआरएचएममधून नियुक्त केलेले व करारपद्धतीवर घेतलेल्या डॉक्टरांना ओपीडीसाठी वेळ निश्चित करून देण्यात येणार आहे. तसेच रुग्णालयात नियुक्त केलेले व करारपद्धतीवर घेतलेल्या डॉक्टरांना लिस्ट लावली जाईल. रुग्णालयात ज्या-ज्या आरोग्य विषयक समस्या व तांत्रिक बाबी असतील त्या सोडविण्यात येतील. 

उपजिल्हा रुग्णालयात येणाºया रुग्णांवर अधिक उपचारासाठी एखाद्यावेळेस खासगी रुग्णालयात हलविण्याची वेळ आली तर त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी सेवाभावी स्वरुपात उपचार करावेत. तसेच कंत्राटी कामगारांना कामगार कायद्याप्रमाणे वेतन मिळावे, खासगी रुग्णालयांना वैद्यकीय अधिकाºयांनी भेट देऊन त्याठिकाणाच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घ्यावा, अशा सूचना कांबळे यांनी केल्या.  

उपजिल्हा रुग्णालयात एनआरएचएममधून नियुक्त केलेले व करारपद्धतीवर घेतलेल्या डॉक्टरांना ओपीडीसाठी वेळ निश्चित करून देण्यात येणार आहे. त्यांची बायोमेट्रिकपद्धतीने दररोज हजेरी घेतली जाणार आहेत. महिन्यातील किती तास त्यांनी कामे त्यानुसार त्यांचे मानधन काढले जाणार आहे. यापूर्वी काही कंत्राटी कामगार काम करीत होते. त्या नव्या ठेकेदाराने कामावरून कमी केले आहे. त्यांना आरोग्य सेवेच्या अन्य कामांमध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल, असे इंगळे यांनी सांगितले.