सावंतवाडी : मागील दहा वर्षांपासून आरोग्य शिबिर आयोजित करणारे आसरोंडी गावचे सुपूत्र डॉ अजित सावंत यांनी यंदा अधिक व्यापक स्वरूपात लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचावी या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे २० डिसेंबर सकाळी ९:३० वाजल्यापासून यूरोलॉजी अर्थात मूत्रपिंड, मूत्राशय व तत्सम अवयवांच्या संबंधित आजारांवर आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे नियोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनासोबत समन्वय साधत केले आहे.
डॉ सावंत हे मुंबईतील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय व सायन हॉस्पिटल येथील युरोलॉजी विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख असून या शिबिरात त्यांच्या सोबत मुंबई युरोलॉजिकल सोसाइटीचे अन्य निष्णात शल्यचिकित्सक सुद्धा भाग घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात म्हणजेच २० डिसेंबर रोजी जिल्हा भरातून येणाऱ्या रुग्णांची तपासणी होणार असून त्यात गरजवंत रुग्णांना शस्त्रक्रिया पुढच्या टप्प्यात शासकीय महाविद्यालयातच व गरज भासल्यास सायन हॉस्पिटल येथे शासनाच्या महात्मा ज्योतिब फुले जनआरोग्य तथा प्रधानमंत्री जनआरोग्य योजने मार्फत करण्यात येणार आहेत. तरी या उपक्रमाचा जिल्ह्यातील गरजवंत रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती आयोजक डॉ अजित सावंत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ मनोज जोशी व या उपक्रमाचे समन्वयक डॉ अमेय देसाई यांच्या मार्फत करण्यात आली आहे.