
आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे ही अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. मोबाईल स्क्रीनवर जास्त वेळ घालवणे, अपुरी झोप, चुकीचा आहार आणि सततचा ताण यामुळे चेहऱ्याची चमक कमी होते आणि त्याचा पहिला परिणाम डोळ्यांखाली दिसतो. अनेक जण हे काळी वर्तुळे लपवण्यासाठी महागड्या क्रीम्स, मेकअप किंवा उपचारांचा आधार घेतात. परंतु खरेतर घरच्या घरी, नैसर्गिक आणि सोप्या उपायांनीही काळी वर्तुळे कमी करता येऊ शकतात. चला तर जाणून घेऊया हे उपाय.गुलाबपाणी हे नैसर्गिक टोनर आहे. त्यातील थंडपणा डोळ्यांना आराम देतो आणि काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतो. गुलाबपाणी फ्रिजमध्ये थंड करून त्यात कापूस भिजवा आणि डोळ्यांखाली ठेवा. 10-15 मिनिटांनी चेहरा धुवा किंवा तसेच वाळू द्या. हा उपाय रोज रात्री झोपण्यापूर्वी केल्यास काही आठवड्यांतच फरक दिसून येतो.
गुलाबपाणी त्वचेला ताजेतवाने करते, तर कच्चे थंड दूध त्वचेला मऊ आणि मॉइश्चरायझ करते. एका भांड्यात समान प्रमाणात गुलाबपाणी आणि थंड दूध मिसळा. या मिश्रणात कापूस भिजवून डोळ्यांखाली 10 मिनिटे ठेवा. नंतर चेहरा धुवा. आठवड्यातून २-३ वेळा हा उपाय केल्याने काळी वर्तुळे कमी होतात.
कोरफड त्वचेला हायड्रेट करते आणि स्वच्छ ठेवते, तर गुलाबपाणी ताजेपणा देतो. एका चमचा गुलाबपाण्यात एक चमचा कोरफडीचा जेल मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट डोळ्यांखाली 15 मिनिटांसाठी लावा आणि नंतर चेहरा धुवा. आठवड्यातून 3 वेळा हा उपाय केल्याने काळी वर्तुळे कमी होतात आणि डोळ्यांना नैसर्गिक चमक मिळते.
रोज किमान 7 ते 8 तास झोप घ्या.
भरपूर पाणी प्या, शरीर हायड्रेट ठेवा.
डोळ्यांवर जास्त ताण देणारे मोबाईल, लॅपटॉप कमी वापरा.
आहारात फळे, भाज्या आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.
रोज थोडा वेळ डोळ्यांना विश्रांती द्या.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे लपवण्यासाठी क्रीम किंवा मेकअपपेक्षा घरगुती उपाय अधिक सुरक्षित आणि प्रभावी आहेत. हे उपाय केवळ नैसर्गिकच नाहीत, तर सहज, स्वस्त आणि कुठलेही दुष्परिणाम नसलेले आहेत. गुलाबपाणी, दूध आणि कोरफडीसारखी नैसर्गिक घटक वापरल्याने डोळ्यांचा तजेला परत येतो आणि चेहऱ्याची चमक वाढते.