
आजकाल उच्च रक्तदाबाची (High Blood Pressure) समस्या खूप वाढत आहे आणि फक्त वयस्करच नाही तर तरुण पिढीही याचा शिकार होत आहे. या समस्येला 'सायलेंट किलर' असेही म्हटले जाते. अमेरिकन हार्ट असोसिएशनने (AHA) आता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.
आतापर्यंत १४०/९० mmHg या ब्लड प्रेशरला सामान्य मानले जात होते, पण आता ही परिभाषा बदलली आहे. नवीन मार्गदर्शक तत्वांसारखे, १३०/८० mmHg पेक्षा जास्त बीपी असल्यास काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी फक्त औषधांवर अवलंबून न राहता जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, अमेरिकेतील जवळजवळ निम्म्या लोकसंख्येला (४६.७%) उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. या नवीन मार्गदर्शक सूचनांमुळे फक्त बीपी नियंत्रणात राहणार नाही, तर एकंदर जीवनशैलीत सुधारणा होईल.
बीपी नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना
१. मीठाचे सेवन कमी करा:- मीठ जास्त खाल्ल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि बीपी वाढतो. यासाठी दररोज २,३०० mg पेक्षा कमी मीठ खाणे योग्य आहे. पॅकेज्ड फूड्स आणि तळलेल्या पदार्थांमध्ये जास्त मीठ असते, त्यामुळे ते खाणे टाळा.
२. व्यसन टाळा:- दारू, तंबाखू आणि कॅफिनसारखे पदार्थ रक्तवाहिन्यांना संकुचित करतात, ज्यामुळे बीपी वाढू शकतो. धूम्रपान करणाऱ्यांना उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो. शक्य असल्यास व्यसने पूर्णपणे सोडा.
३. तणावापासून दूर राहा:- तणावामुळे शरीरात कोर्टिसोल आणि ॲड्रेनालिनसारखे हार्मोन्स बाहेर पडतात, जे लगेच बीपी वाढवतात. ध्यानधारणा (Meditation), प्राणायाम आणि व्यायामाने तणाव कमी करता येतो. याशिवाय, दररोज ७-८ तास शांत झोप घेणेही महत्त्वाचे आहे.
४. वजन नियंत्रित ठेवा:- जास्त वजनामुळे हृदयावर जास्त दाब येतो आणि बीपी वाढण्याचा धोका असतो. नियमित व्यायाम, कमी कॅलरीचा आहार आणि निरोगी खाण्यापिण्याच्या सवयींनी वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.
५. आरोग्यपूर्ण आहार घ्या:- सकस आणि संतुलित आहार बीपी नियंत्रणासाठी महत्त्वाचा आहे. तुमच्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि कमी फॅट असलेले दुग्धजन्य पदार्थ समाविष्ट करा. केळी, टोमॅटो आणि पालेभाज्यांमध्ये पोटॅशियम असते, जे बीपी कमी करण्यास मदत करते. तळलेले, गोड आणि प्रोसेस्ड फूड्स खाणे टाळा.