
ग्रामीण आरोग्य, शैक्षणिक उन्नतीच मूर्तीमंत उदाहरण
सावंतवाडी : चिपळूणजवळीलच डेरवण गाव वैद्यकीय शिक्षण आणि समाजसेवेचं केंद्र बनलं आहे. श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट च्या बी.के.एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचा नुकताच सिंधुदुर्गातील पत्रकारांनी केलेला अभ्यास दौरा या गोष्टीची साक्ष देत आहे. हे संकुल म्हणजे ग्रामीण भागाच्या आरोग्य आणि शैक्षणिक उन्नतीचं एक जिवंत उदाहरण आहे.
या दौऱ्याच्या सुरुवातीला रुग्णालय संचालिका डॉ. सौ. सुवर्णा पाटील यांनी संस्थेची उद्दिष्ट्ये, आधुनिक सोयीसुविधा आणि गरजू रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शस्त्रक्रियांची माहिती दिली. इथे शिक्षण आणि आरोग्यसेवा दोन्ही हातात हात घालून चालतात असं त्यांचे मत आहे. तर डॉ. नेताजी पाटील यांनी रुग्णालयातील कोट्यवधी रुपयांची अत्याधुनिक मशिनरी आणि उपचार पद्धतींबद्दल सविस्तर माहिती दिली. यामुळे आता ग्रामीण भागातील लोकांना उपचारांसाठी शहरात जाण्याची गरज राहिलेली नाही. या संस्थेमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. ज्यामुळे ग्रामीण भागातून होणारं स्थलांतर कमी झालं आहे.
२०१५ साली स्थापन झालेलं हे महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न असून, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने त्याला मान्यता दिली आहे. एमबीबीएस आणि एमडी/एमएस सारख्या अभ्यासक्रमांसाठी NEET परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. कॅम्पसमध्ये असलेलं ८१० खाटांचं रुग्णालय, आधुनिक विभाग आणि सुविधांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळतो. १५० विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयासोबतच येथे अनेक पॅरामेडिकल अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ज्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या हमखास संधी मिळतात. हे महाविद्यालय ग्रामीण आरोग्य क्षेत्रातील संशोधनालाही प्रोत्साहन देतं.
खेळाच्या माध्यमातून आरोग्याचा ध्यास
या संकुलातील सर्वात अभिनव उपक्रम म्हणजे 'ड्रीम हेल्थ पार्क'. २० ऑक्टोबर २०१८ रोजी पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या संग्रहालयाने १५ हजारहून अधिक विद्यार्थी आणि खेळाडूंना आरोग्यविषयक ज्ञान दिलं आहे. १६०० चौ. मी. जागेत उभारलेला हा पार्क १० ते १८ वयोगटातील मुलांसाठी खेळाच्या माध्यमातून आरोग्याचे धडे देतो. इथे मुलं आपला बॉडी मास इंडेक्स मोजतात आणि जंक फूडचे दुष्परिणाम, योग्य आहाराचं महत्त्व तसेच रक्तक्षय कसा ओळखावा याची माहिती मिळवतात.वालावलकर संकुल केवळ वैद्यकीय शिक्षणापुरतं मर्यादित नाही. विद्यार्थ्यांच्या आणि स्थानिक तरुणांच्या सर्वांगीण विकासाचं हे केंद्र आहे. फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, रायफल शूटिंग आणि जलतरणापासून ते ३५ हून अधिक खेळांसाठी इथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आहेत. तसेच, ४०० मीटरची सिंथेटीक ओव्हल धावपट्टी आणि १०० मीटरची सरळ धावपट्टीही तयार करण्यात आली आहे. येथे दरवर्षी 'डेरवण युथ गेम्स' सारखे कार्यक्रम आयोजित करून कोकणातील खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा दाखवण्याची संधी दिली जाते.
सामाजिक कार्यातही संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत गरिबांना मोफत उपचार, गर्भवती मातांसाठी 'वालवलकर यशोदा योजना' आणि 'वालवलकर माहेर योजना', कुपोषित मुलांसाठी 'वालवलकर सुदामा योजना' आणि मोफत मोतीबिंदू शिबिरं यांसारख्या उपक्रमांनी संस्थेने समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत डेरवण हॉस्पिटल म्हणजे फक्त कॅन्सर हॉस्पिटल अशी ओळख होती. पण, येथे जनरल मेडिसिन, बालरोग, रेडिओलॉजी, ऑर्थोपेडिक्स, ॲनेस्थेसिया यांसारखे विभागही कार्यरत आहेत. महात्मा फुले योजना, आयुष्यमान भारत आणि इतर शासकीय योजनांअंतर्गत सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया येथे मोफत उपलब्ध आहेत. रुग्णालयात कर्करोगाच्या उपचारांसाठी अत्याधुनिक सुविधा आहेत. ज्यामुळे स्थानिक लोकांना उपचारांसाठी मुंबई किंवा इतर शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. गर्भवती महिलांसाठी प्रसूती आणि आरोग्य सेवांसाठी विशेष योजना आहेत. कुपोषित मुलांना पौष्टिक आहार आणि आरोग्य सेवा देण्यासाठीही येथे केंद्र कार्यरत आहे.
रुग्णालयात डेंग्यू, चिकुनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस आणि स्वाईन फ्लू यांसारख्या रोगांवर संशोधन आणि निदान करण्यासाठी विषाणू विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध आहे. अत्याधुनिक मशिनरींद्वारे येथे संशोधन केले जाते आणि परदेशातूनही अभ्यासक येथे भेटी देत आहेत. एकंदरीत, डेरवण येथील बी.के.एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय हे केवळ एक शिक्षण केंद्र नसून कोकणातील ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी आणि नवीन पिढीला उज्ज्वल भविष्याची दिशा मिळावी हे स्वप्न प्रत्यक्षात आणणारं एक केंद्र असल्याचे दिसून येत आहे.