
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयाला शिंदे सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या सिटीस्कॅन मशीनला एक वर्ष पूर्ण झालं आहे. सरकारच्या माध्यमातून एका खासगी कंपनीकडे ही सेवा देण्यासाठी करार केला होता. आज जवळपास 9 हजार पेक्षा जास्त रुग्णांना या सिटीस्कॅनचा विनामूल्य सेवा मिळाल्याने लाभ मिळाला आहे अशी माहिती रवी जाधव यांनी दिली. एवढंच नाही तर पेशंटला इतरत्र हलविण्यासाठी होणारा मनस्ताप व हजारोंचा आर्थिक भुर्दंड देखील वाचला आहे. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांकडून समाधान व्यक्त करत सरकारचे आभार मानले आहेत.
या रुग्णांना सिटीस्कॅन चाचणीसाठी प्रायव्हेटमध्ये तीन ते चार हजार रुपये मोजावे लागत होते. ते गोरगरीब रुग्णांना परवडण्यासारखे नव्हते. हा विषय लक्षात घेऊन जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे यशस्वीरित्या पाठपुरावा करून सिटीस्कॅन सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी मागणी केली होती.
यानुसर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये विनामूल्य 24 तास ही सेवा उपलब्ध करून दिली. या सेवेचा लाभ आजपर्यंत 9 हजार पेक्षा जास्त रुग्णांनी घेतला असून या सेवेला एक वर्ष पूर्ण होत आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी दिली.
येथील सीटीस्कॅन ऑपरेटर स्टाफ 24 तास रुग्णांना सेवा देत आहे. ही सेवा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व क्रस्ना डायग्नोस्टिक लि. यांच्या संयुक्त विद्यमानाने भागीदारी तत्त्वावर सुरू आहे. सीटीस्कॅन तपासणी सेवा डिपार्टमेंट मॅनेजर प्रथमेश परब,नर्स आकांशा कानसे, परशुराम कांबळे टेक्निशियन, शुभम कट्टीकर रिसेप्शन व हाउसकीपिंग स्वप्निल गिडमणी यांच्याद्वारे ही सेवा 24 तास दिली जात आहे. गोरगरीब रुग्णांना मोफत सेवा मिळत असून खिशाला पडणारा आर्थिक भुर्दंड देखील वाचला आहे. एवढंच नाही तर या गोष्टीसाठी रूग्णांची होणारी हेळसांड देखील थांबली आहे. अन्यथा केवळ यासाठी कुडाळ, ओरोस किंवा बांबोळी गाठावी लागत होती. त्यामुळे नागरिकांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्याजवळ युवा रक्तदाता संघटना व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथील खराब झालेल्या स्वच्छतागृह व त्याची दुरुस्ती करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन मंत्री राणे यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल दोन्हीही संघटनांकडून त्यांचे आभार मानण्यात आलेत.