LIVE UPDATES

होमिओपॅथिक डॉक्टरांची वैद्यकीय परिषदेत नोंदणी म्हणजे गंभीर आरोग्य धोका : डॉ. कांचन मदार

Edited by: मनोज पवार
Published on: July 07, 2025 19:38 PM
views 31  views

चिपळूण :  महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) दिनांक ३० जून २०२५ रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार ‘समकालीन औषधशास्त्र अभ्यासक्रम’ (Certificate Course in Modern Pharmacology - CCMP) पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना वैद्यकीय परिषदेत नोंदणी करण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र हा निर्णय सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारा आहे, अशी माहिती डॉ. कांचन मदार (संयोजिका, महिला डॉक्टर विंग, महाराष्ट्र राज्य) यांनी दिली.

या निर्णयाचा निषेध करताना डॉ. कांचन मदार म्हणाल्या, “होमिओपॅथिक डॉक्टरांनी केवळ एक वर्षाचा समकालीन औषधशास्त्र अभ्यासक्रम (CCMP) पूर्ण केल्याने त्यांना ‘वैद्यकीय’ डॉक्टर समजणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. एमबीबीएस ही पाच वर्षांची कठीण आणि शिस्तबद्ध पदवी आहे. अशा तात्पुरत्या अभ्यासक्रमातून पूर्ण वैद्यकीय शिक्षणाची समकक्षा साधता येऊ शकत नाही.”

“महाराष्ट्र वैद्यकीय परिषद ही केवळ एमबीबीएस व तत्सम वैद्यकीय पदवी प्राप्त केलेल्या डॉक्टरांसाठी आहे. होमिओपॅथिक डॉक्टरांना स्वतंत्र परिषद अस्तित्वात असताना त्यांना वैद्यकीय परिषदेच्या यादीत सामावून घेणे म्हणजे नियम धाब्यावर बसवण्याचा प्रकार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

“या निर्णयामुळे दोन पूर्णपणे वेगळ्या उपचारपद्धतीच्या डॉक्टरांना एकाच व्यासपीठावर आणल्यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर आणि उपचार प्रक्रियेच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होऊ शकतो,” असा इशाराही डॉ. मदार यांनी दिला.

या अन्यायकारक निर्णयावर त्वरित पुनर्विचार व्हावा, अशी विनंती त्यांनी राज्य शासनाला केली आहे. तसेच, विधानसभेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. “होमिओपॅथिक डॉक्टरांनी त्यांचे कार्य त्यांच्या परिषदेअंतर्गत करावे. त्यांना वैद्यकीय परिषदेतील नोंदणी देऊ नये. अन्यथा राज्यभरातील आधुनिक वैद्यकीय डॉक्टर आंदोलन करण्यास भाग पाडले जातील,” असा इशाराही डॉ. कांचन मदार यांनी दिला.