ब्युरो न्यूज : सुखी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या तिन्ही मुलभूत गरजांसोबतच झोप देखील तितकीच महत्वाची असते. पुरेशी झोप घेणं प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी खूपच आवश्यक आहे. सोशल मीडियाच्या काळातील बिघडलेली दिनचर्या आणि वाईट सवयींमुळे अनेकांची झोप अपूर्णच राहते ज्याचा वाईट परिणाम आरोग्यावर दिसून येतो. अपूर्ण झोपेमागचं सर्वात मोठं कारण मोबाईल आणि टीव्ही हे आहे.
अनेकजण रात्री उशीरापर्यंत मोबाईल, टीव्ही पाहतात. या गोष्टींच्या अधिक वापरामुळे झोप अपूर्ण राहते. झोप पूर्ण न झाल्यामुळे चिडचिड, रक्तदाब आणि तणावाच्या समस्यला देखील उद्भवतात. खरं तर, सध्या हे त्रास तरुण वर्गामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. या समस्या कमी झोपेमुळंच सुरु होतात.
शांत झोपेसाठी तुमचं डोकं पूर्ण शांत राहणं गरजेचं आहे. पण बरेच लोक झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही बघतात. मोबाईलवर गेम खेळणं, चॅट करणं किंवा सोशल मीडियावर रिल्स पाहणं. तसेच टीव्हीवर चित्रपट पाहणं, मालिका पाहणं यामुळे अनेकजण आपलं मनोरंजन करत असतात. परंतु या सगळ्यामुळे पुन्हा डोक्यातील विचारचक्र सुरु होते. त्यामुळं डोकं शांत होण्याऐवजी पुन्हा धावायला लागतं. अशावेळी झोप येत असतानाही ती येत नाही. ज्याचा परिणाम नकळत आरोग्यावर होतो.
- झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी मोबाईल, टीव्ही काहीही पाहू नये.
- झोपण्याआधी घरामध्ये हिंसन मालिका, चित्रपट लावू नये.
- झोपण्यापूर्वी आपल्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं वा विचार करावा.
- झोपण्यापूर्वी पुढील दिवसाचे नियोजन करावे.
- झोपण्यापूर्वी मेटिडेशन करावं तसेच आपल्या आवडीचे पुस्तक वाचावं.
- रात्रीचं जेवण झाल्यानंतर लगेच झोपू किंवा बसू नये. थोडा वेळ शतपावली करावी.