सिंधुदुर्गनगरी : पावसाळ्यात डोळे येण्याचा संसर्गजन्य आजार वाढत असून नागरिकांनी योग्य काळजी घेवून उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांनी केले आहे.
पावसाळा या ऋतुमध्ये जे संसर्गजन्य आजार फोफावतात त्यामध्ये डोळे येणे हा प्रमुख आजार आहे. हा एक वेगाने पसरणारा आजार आहे. परंतु खुप गंभीर स्वरुपाचा समजला जात नाही. पण हा संसर्गजन्य आजार असल्याने, डोळयासारख्या नाजूक अवयवावर त्याचा परिणाम होत असल्याने आणि तो बरा व्हायला बराच कालावधी लागत असल्याने तो होऊ नये याची काळजी घेणे योग्य आहे.
यामध्ये डोळे येण्याची प्रमुख लक्षणे:- १) डोळे लाल होऊ लागणे. २) डोळयातुन पाणी यायला लागणे व सूज येणे.३) डोळयांना वारंवार खाज येऊ लागणे. ४) डोळयात थोडा चिकटपणा येणे.अशी आहेत.
डोळे आल्यास घ्यावयाची काळजी व उपचार:- (१) डोळे आल्यास साधारणपणे दोन आठवडयांच्या कालावधीत हा आजार बरा होण्याची शक्यता असते. २) डोळे आल्यानंतर सर्वप्रथम आपल्या नजीकच्या नेत्रशल्य चिकित्सक व वैद्यकिय अधिकारी किंवा जवळचे डॉक्टर यांचेशी संपर्क साधून योग्य तो सल्ला घेऊन उपचार घेण्यात यावे. कोणतेही घरगुती उपचार करू नये. ३) हा संसर्ग ज्यांना झाला आहे त्यांना प्रकाशाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी गॉगल वापरावे तसेच हात स्वच्छ धुत राहावे.४) कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर टाळावा. ५) संसर्ग झालेल्या व्यक्तीने वापरलेले रुमाल, टॉवेल इतरांनी वापरणे टाळावे तसेच डोळ्यांना सारखा हात लावू नये. असे आवाहन ही जिल्हा शल्यचिकित्सक श्री. पाटील यांनी केले.