खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तणाव, प्रदूषण, धूम्रपान, मद्यपान, दीर्घकाळ एका ठिकाणी बसून काम करणे यामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, थायरॉइड अशा समस्या त्रास देऊ लागतात
प्रामुख्याने चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे हे आजार लवकर बरे व्हावे यासाठी बॉडी डीटॉक्स करणे आवश्यक आहे. डीटॉक्स करून विषद्रव्ये शरीराबाहेर टाकल्यास तब्येतीत लवकर सुधारणा होण्यास मदत होऊ शकते.
बॉडी डीटॉक्स कशी करावी याचे शास्त्रशुद्ध तंत्र आहे. आयुर्वेदात तर बॉडी डीटॉक्स करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. यापैकी एक आयुर्वेदिक पद्धत बॉडी डीटॉक्स करण्यासाठी लाभदायी आणि सर्वाधिक प्रभावी समजली जाते.
आयुर्वेदानुसार शरीरात वात, कफ, पित्त हे त्रिदोष सामावलेले असतात. जेव्हा वात, कफ, पित्त यांच्यातील किमान एका घटकाची पातळी वाढते तेव्हा आपोआप उर्वरित दोन पैकी किमान एका घटकाची पातळी कमी होते आणि शरीरात समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते. त्रिदोषांचे संतुलन बिघडते तेव्हाच शरीरात विषद्रव्ये निर्माण होण्यास सुरुवात होते.
नेती आणि नस्य केले तर सायनस, सर्दी, खोकला या समस्यांतून बरे होण्यास मोठी मदत होते. नेतीसाठी नेती पॉट नावाचे भांडे मिळते. या भांड्यातील पाणी एक नाकपुडीवाटे शरीरात घेऊन दुसऱ्या नाकपुडीवाटे शरीराबाहेर टाकता येते.