108 सेवा बंद, बेमुदत आंदोलन

'गोवा पे निर्भर' सिंधुदुर्गवासियांचे हाल
Edited by: विनायक गांवस
Published on: July 01, 2025 12:32 PM
views 225  views

सामाजिक संघटनांची रूग्णांसाठी धाव 

सावंतवाडी : १०८ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य संलग्न सेंट्रल ऑफ इंडीयन ट्रेड युनियन (सिटु) १०८ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या न्याय मागण्या आणि समस्या आरोग्यमंत्र्यांनी सोडविण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०८ सेवा देखील बंद झाली आहे. यामुळे केवळ गोवा बांबोळीच्या भरवशावर असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोरगरीब रुग्णांना मोठा फटका बसणार आहे. 

१०८ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून समान काम, समान वेतन तत्वावर वेतन व भत्ते १४ ऑक्टोबर २०२४ च्या अधिसुचनेनुसार कुशल दर्जाचे वेतन अदा करावे ८ तासांपेक्षा जास्त कामाबाबत दुप्पट दराने मोबदला सर्व प्रकारच्या कायदेशीर रजा व रजेचे वेतन कॅशलेस आरोग्य विमा, ८.३३% वार्षिक बोनस, वाहन धुलाई भत्ता १० तारखेच्या आत वेतन, ५ वर्षानंतर ग्रॅज्युटी, फुल अलाऊन्स इ. प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. आरोग्यमंत्र्यांनी त्या सोडवाव्यात अशी मागणी त्यांचा आहे‌. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात मोठा फटका बसला आहे. लहान सहान कारणांसाठी देखील गोवा येथे रेफर केल्या जाणाऱ्या गोरगरीब रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे‌. कुचकामी आरोग्य यंत्रणेस जबाबदार असणाऱ्या मंत्री, आमदार, खासदारांना मात्र कोणतही सोयर सुतक राहिलेलं नाही अशी संतप्त भावना रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, युवा रक्तदाता संघटना व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने यासाठी पुढाकार घेतला आहे. सावंतवाडी तालुक्यातील रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून युवा रक्तदाता संघटना व  सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान संघटनेने जिल्हा रुग्णालय किंवा गोवा बांबोळी येथे रुग्णांना नेण्यासाठी  रुग्णांची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे, रवी जाधव, रूपा मुद्राळे लक्ष्मण कदम यांनी ही सेवा देण्याची जाहीर केले आहे.