कोकणचं पहिलं दैनिक कोकणसाद व कोकणचं नं. 1 महाचॅनल कोकणसाद LIVE च्या माध्यमातून 'जागर' कोकणच्या साहित्य रत्नांचा', ही विशेष सदर आम्ही घेतोय. याच्या २६ व्या पुष्पात कवी सिद्धार्थ तांबे यांची खास मुलाखत आपल्या समोर घेऊन येत आहोत. दैनिक कोकणसादचे संपादक संदीप देसाई यांनी घेतलेली ही मुलाखत.
कवी सिद्धार्थ तांबे, मुलाखत
साहित्याकडे तुम्ही कसे वळला ?
साहित्याकडे वळलो कारण डीएड होत असताना उत्तम पवार यांची भेट. प्रवासात वारंवार आमची भेट व्हायची. दोघांची अभिरुची एक होती. 'कनक' या अंकात त्यांच्या कविता प्रसिद्ध व्हायच्या बक्षीस मिळायची. त्यातून मला कवितेची प्रेरणा मिळाली. शालेय जीवनापासून मला वाचनाची आवड होती. कवितेचा पिंड माझा नव्हता. मात्र, संगीताची आवड होती. माझे मामा वसंत तांबे प्रल्हाद शिंदेंच्या तालमीत असायचे. साथीदार म्हणून सोबत होते. भीमज्योत गायन पार्टी त्यांनी चालविली. पुढे मी आम्रपाली गायन पार्टी शिवडाव ही चालवली. गाण्याचे संस्कार माझ्यावर होते. परिवर्तनवादी विचार होते. १९९० च्या दरम्यान दर्पण नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या स्नेहसंमेलनात कविसंमेलन म्हत्वाचा भाग असायचा. इतरांच्या कविता ऐकताना आपणही काहीतरी करू शकतो ही प्रेरणा मिळाली अन् कवीतेचा जन्म झाला.
आपला कविता लेखनाकडे अधिक कल दिसतो, काय सांगाल?
कविता लिहीत गेलो. मात्र, कथे विषयीची अभिरूची अधिक झाली नाही. कविता लिहीत गेलो. तसं लेखन करता येऊ शकतं. येत नाही असं नाही. भविष्यात लिहिलं जाऊ शकत. मराठी कवितेचा मी एक अभ्यासक आहे. आंबेडकरी कवितेचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्याची मानसिकता आहे. त्यादृष्टीने कथा लेखन होऊ शकेल. वैचारिक लेखन, ललित बंध लिहिण्याचा माझा प्रयत्न आहे. कवीकडे असावी लागणारी सामाजिक बदलाची आस माझ्यात आहे.
गेल्या ३५ वर्षांचा साहित्य, कला, संगीत क्षेत्रातील प्रवास कसा होता ?
साहित्य क्षेत्रात असताना दर्पणची चळवळ चालवली. १९९० मध्ये सुरू केलेलं दर्पण सांस्कृतिक मंच कणकवलीच रूपांत आता फुले-आंबेडकर दर्पण प्रबोधीनी सिंधुदुर्गत केल. सिंधुदुर्गतील सगळ्या युवकांना यात सामावून घेण्याचा विशाल दृष्टिकोन ठेवत हे रूपांतर केलं आहे. हे करत असताना गाण्याचा ध्यास देखील चालूच होता. सांस्कृतिक कार्यक्रमांचा जल्लोष असायचा. आंबेडकर, फुले, बुद्धांच्या जीवनावर आधारित गीत सादर करण्याच काम मी करायचो. आंबेडकर शाहिरी, आंबेडकर जलसा अण्णाभाऊंच्या चळवळीतून आला आहे. तो वैचारिक वारसा फुले, आंबेडकरांच्या विचारातून आला आहे. तो वारसा चालवत आहे. बौद्ध धम्माचा विचार धम्म प्रवचनाच्या माध्यमातून चालविण्याच काम दर्पण चळवळीच्या माध्यमातून करत आहे. लोकांना दिशाहीन न करता युवकांना वैचारिक सुत्रांत बांधून ठेवण्याच काम करत आहोत. युवकांना वैचारीक भान देण्याच काम करत आहोत. सिंधुदुर्गच्या साहित्य चळवळीत दर्पणच्या चळवळीचा मोठा वाटा आहे. सिंधुदुर्गच्या साहित्यात सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग साहित्य संघ, कोमसाप यांनी मला कवितेसाठी प्रेरणा दिली. कवितेसह गाण्याची आवड असल्याने पुढच्या काळात संगीतातही काहीतरी करण्याचा मानस आहे.
परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून तुमची ओळख आहे. याबद्दल काय सांगू इच्छिता ?
सामाजिक चळवळ म्हणून आम्ही दिशा दिलेली आहे. महाराष्ट्र जे घडत त्यांचे पडसाद जिल्ह्यात उमटत असतात. राजकीय पटलावर ज्या गोष्टी घडतात त्याचेही पडसाद उमटत असतात. सामाजिक चळवळ चालवताना अनेक संस्थांना एकत्र घेत काम केलं. हे सर्व करत असताना युवकांना एका जातीचा समुदाय म्हणून नव्हे. एका जातीला, समुदायाला एकत्र करून जातसंस्था मोडीत निघणार नाही. एक व्यापक व निरपेक्ष दृष्टीकोन ठेऊन तटस्थपणे इतर वर्गानं बहुजन समाजातील लोकांनी एकत्र यायला हवं. आपला इथला वारसा पाहिला तर मोठीमोठी मंदीर ही विहार असण्याची शक्यता जास्त आहे. तिथले अवशेष ते बौद्ध संस्कृतीच दर्शन घडविणारे आहे. आध्यात्माचा वारसा बौद्ध संस्कृतीतूनच देशात आला आहे. देशात, जगात गेलेला तो दिसतो. बुद्ध म्हणजे ध्यान करण आत्मज्ञान करणं आहे. आत्मज्ञानाची विविध केंद्र जी संप्रदायाच्या माध्यमातून दिसतात ते जे शिकवत आहेत ते बौद्ध धम्माचा तत्वज्ञान आहे. केवळ नाव वेगवेगळी आहेत. माणसाला प्रकाशाकडे घेऊन जाणारा बौद्ध धर्माचा विचार आहे. हा विचार जीवनात अंगिकारण आवश्यक आहे.
'सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने' या आपल्या काव्यसंग्रहा विषयी काय सांगाल. यामागे संकल्पना काय होती ?
काव्यसंग्रहाची प्रेरणा प्रसंवाद हे अंक आहे. त्याचे कार्यकारी संपादक अनिल जाधव यांची आहे. तसेच सुनील हेतकर यांच्याकडून संपादनाची प्रेरणा मिळाली. सुरूवात उत्तम पवार यांच्यापासून आहे. कवितेला संग्रहाच रूप येण्याचं काम वरील दोन मंडळींनी केलं. तसेच कवी मोहन शिरसाट यांचही सहकार्य लाभल. कविता संग्रह प्रकाशित करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिल. या सर्वांच्या मदतीने काव्यसंग्रह प्रकाशित करण्याची प्रेरणा मिळाली.
तुम्हाला भावलेली तुमची कविता कोणती ?
मला भावलेली माझी कविता सावित्रीबाईंवरची आहे. जी स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देते त्याला दिशा देणारी आहे. "सावित्रीबाई, तू दिलीस ओळख अक्षरांची'' ही ती कविता आहे. दुसरी म्हणजे बाबासाहेबांना अभिवादन करणारी देशाचा पासवर्ड असावी अशी अपेक्षा असलेली कविता आहे. बाबासाहेबांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही बदलेला नाही. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जातीयवादी राहीला आहे. बाबासाहेब हे कोणत्या एका जातीचे जन्मान झाले होते. मात्र, आज ते देशाचे झाले आहेत. पण,
त्यांच्या फोटो केवळ दलितांच्या घरात दिसतो. सरकारी कार्यालयात दिसतो तसा न दिसता तो बहुजन समाजातही तो दिसावा. सावित्रीबाईंचा फोटो आपल्या घरी लागावा असं स्त्रीयांना का वाटत नाही ? अनेकजण यावर बोलतात पण, त्यांच्या घरात अनुकरण दिसत नाही. समाजवादी चळवळीचे कार्यकर्ते, कम्युनिस्ट, समाजातील विविध स्तरातील, जाती धर्मातील लोक बोलतात. परंतू,आपल्या घरात प्रतिबिंब दाखवत नाही याचा खेद आहे. जातीच्या पलिकडे जाण्याची प्रक्रिया जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत हे घडणार नाही. समाज म्हणून व्यापक असं सामाजिक संघटन सर्व जातींच्या पलिकडे असेल असं तयार झालं पाहिजे. या जिल्ह्याला सुविधा देणार ते असावं. ते पक्षपातळीच नव्हे तर सामाजिक हिताच असावं.
साहित्यातील तुमचे आवडते कवी कोण ?
नामदेव ढसाळ यांची कविता प्रेरणा देणारी ठरली. अरूण काळे, दिवंगत प्रा. सिद्धार्थ तांबे, उत्तम पवार आदींच्या कविता प्रेरणादायी वाटतात. हे कवी प्रेरणादायी, दिशादर्शक आहेत. त्यांच्या प्रेरणेतून मी देखील कवी म्हणून प्रस्थापित झालो. माझ्या कविता संग्रहाला देखील अनेक पुरस्कार मिळत आहेत. पुरस्कारांसाठी लिहीलं नव्हते. मात्र, समाजानं लिखाणाची दखल घेतली.
कवितेचे अभ्यासक म्हणून आजच्या मराठी कवितेविषयीची नवकवींविषयी काय सांगाल ?
आता कवी हे पैशापासरी झालेले आहे. दिवसाला एक कविता लिहीतो असं काहीजण सांगतात. यातून खरा कवी बाहेर पडणार नाही. मनोरंजनासाठी कविता लिहीणारे खूप लोक असतात. कवी हा गीतकार असतो. जुळवाजुळव करून मी देखील लिहू शकतो.चांगली कविता बाहेर पडायला वेळ लागतो. कवी आणि लेखक हे राजकीय व्यवस्थेला धोकादायक वाटू लागले आहेत. कवींवर पहारा ठेवला जात आहे. त्यामुळे कवीनी गांर्भियान लिहाव, पहारा राहावा म्हणून नाही. देशाला समाजाला उज्वल भविष्य द्यावं. कवी हे सामाजिक, राजकीय, धार्मिक उन्मादाला प्रश्न विचारण्याच काम करतात. आमचे काय चुकले हे प्रश्न विचारले गेले पाहिजे.
छाया प्रसाद कदम
शब्दांकन विनायक गांवस