
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा येथे रस्ता सुरक्षा जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी एलईडी स्क्रीनसह सुसज्ज ‘रस्ता सुरक्षा चित्ररथ’ संपूर्ण जिल्हाभर फिरत असून त्यामार्फत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली जात आहे. अत्याधुनिक ध्वनीप्रणाली आणि आकर्षक दृश्य माध्यमांच्या साहाय्याने ही मोहीम नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या चित्ररथाद्वारे वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचे अनिवार्य महत्त्व, मद्यपान करून वाहन चालविण्याचे गंभीर दुष्परिणाम, वेगमर्यादेचे काटेकोर पालन तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत माहितीपूर्ण व्हिडिओ, लघुपट आणि संदेश प्रदर्शित केले जात आहेत.
गावागावांत, गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी हा चित्ररथ पोहोचत असून नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः युवकांमध्ये सुरक्षित वाहनचालना संदर्भात सकारात्मक बदल दिसून येत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
या उपक्रमाचे नेतृत्व सहायक मोटार वाहन निरीक्षक अमित पाटील यांनी केले असून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.
“रस्ता सुरक्षा ही केवळ मोहीम नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,” हा संदेश प्रभावीपणे पोहोचवत ‘रस्ता सुरक्षा चित्ररथ’ जिल्ह्यात सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतुकीसाठी नवा जागर निर्माण करत आहे.










