कुजलेला वास, अंगावर ठिकठिकाणी वार

गणपती सान्यानजीक जे दिसलं ते पाहून धक्का बसला
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 23, 2025 20:45 PM
views 81  views

कणकवली : तालुक्यातील साळीस्ते‌ येथे महामार्गालगतच्या गणपती सान्याच्या पायरीवर अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मयत पुरुषाच्या अंगावर अनेक वार झालेले आढळले. घटनेची माहिती समजतात कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती. 


वाहन चालक रवींद्र गुरव हे महामार्गाने जात असताना त्यांना साळीस्ते येथील गणपती सान्यानजीक कुजलेला वास आला. त्यांनी वाहन थांबवून पाहणी केली असता गणपती सान्याच्या पायरीवरच पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या अंगावर हाफ शर्ट व फुल पॅंट होती तर चेहरा कुजलेल्या स्थितीत होता. 


गुरव यांनी सदरची माहिती साळीस्ते गावचे पोलीस पाटील गोपाळ चव्हाण यांना दिली. चव्हाण यांनी कळविलानुसार कणकवली पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या अंगावर ठिकठिकाणी वार होते. बराच रक्तस्त्रावही दिसून आला. त्यामुळे हा खूनच आहे, अशा निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत. सायंकाळच्या सुमारास मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. मृतदेहाचे वय अंदाजे ४५ वर्षे आहे.  घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.