
मालवण : चाफेखोल सडा येथील चिरेखाणीचा काही भाग मातीच्या भरावाने बुजविण्याचे काम सुरु असताना डंपर मागे घेताना डंपर पलटी होऊन झालेल्या अपघातात डंपर चालक सुरज सोनु वायंगणकर (२२) रा. चाफेखोल वायंगणकरवाडी हा युवक जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला.
दरम्यान, मालवण पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेण्यात आला. शवविच्छेदन व पुढील कार्यवाही मालवण ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाणे येथे सुरु होती.
मालवण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चाफेखोल येथील धनंजय धोंडी नाईक यांच्या चिरेखाण येथे सुरज सोनु बायंगणकर हा युवक धनंजय नाईक यांच्या डंपरवर (एम. एच. ०७. एक्स. ०२०४) कार्यरत होता. गुरुवारी सकाळी खाणीवरील चिरे काढलेल्या काही भागात भराव टाकण्याचे काम सुरु होते. या दरम्यान, डंपर मागे घेत असताना डंपर पलटी झाला. यात सुरज याच्या अंगावर डंपर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलीसांनी माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक मारुती जगताप, उपनिरीक्षक संदिप खाडे, प्रकाश मोरे, अजय येरम, मुल्ला आदी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला. मालवण ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान याप्रकरणणी पुढील कार्यवाही सुरु होती.
सुरज वायंगणकर याचे वडील चालक आहेत. सुरजही महाविद्यालयीत शिक्षण पुर्ण करुन काही महिन्यांपासून चिरेखाणीवर डंपर चालक म्हणुन कार्यरत होता. आज भाऊबीज असल्याने कुटुंबियांनी आज जाऊ नको असे सांगुनही तो कामावर गेला होता. मात्र त्याचे दुर्दैवी अपघातात निधन झाले. सुरज याची घरची परिस्थिती बेताची आहे. त्याच्या पश्चात आई वडील व अन्य परिवार आहे.