ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात गुरुवारी (27 ऑक्टोबर) तिसरा सामना ब गटातील पाकिस्तान आणि झिम्बाब्वे (PAKvZIM) यांच्या दरम्यान खेळला गेला. पर्थ येथे झालेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने 130 धावांचा बचाव करताना एका धावेने सामना जिंकला.
पर्थ येथे झालेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या दोन्ही सलामीवीरांनी 5 षटकात 42 धावांची सलामी दिली. मात्र, त्यांचे दोन्ही सलामीवीर एकापाठोपाठ तंबूत परतले. सुंबा फारसे योगदान देऊ शकला नाही. शादाब खान व मोहम्मद वसीम यांनी सहा चेंडूच्या अंतरात झिम्बाब्वेचे चार गाडी तंबूत पाठवत पाकिस्तानला सामन्यात पुन्हा जागा बनवून दिली. मात्र, सीन विल्यम्सच्या 31 व ब्रॅड एवान्सच्या 19 धावांच्या जोरावर झिम्बाब्वेने 130 धावा धावफलकावर लावल्या. पाकिस्तानसाठी मोहम्मद वसीम याने चार तर शादाबने 3 बळी मिळवले. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा अपयशी ठरत केवळ चार धावा काढून बाद झाला. मोहम्मद रिझवानही 14 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. भारताविरुद्ध आक्रमक अर्धशतक ठोकणारा इफ्तिखार अहमद 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर शान मसूद व शादाब खान यांनी संघर्ष केला. मात्र, सिकंदर रझाने शादाब व हैदर यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करत पाकिस्तानला अडचणीत टाकले. मसूदही 44 धावा करत यष्टीचित झाला. त्यानंतर झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी पाकिस्तानवर दबाव आणला. अखेरच्या दोन षटकात 22 धावांची आवश्यकता असताना नवाझने षटकार मारत सामना समान स्थितीत आणला. अखेरच्या षटकात विजयासाठी 11 धावांची गरज असताना, इवान्स याने पहिल्या दोन चेंडूवर सात धावा येऊनही सामना झिम्बाब्वेला जिंकून दिला.