
सावंतवाडी : सालईवाडा येथील मारुती मंदिराजवळील एका इमारतीच्या सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रलंबित प्रश्न प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या तत्परतेमुळे अवघ्या एका तासात सुटला आहे. वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाला बाजूला सारत, नगराध्यक्षांनी स्वतः मैदानात उतरून हा प्रश्न मार्गी लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सालईवाडा मारुती मंदिराजवळील एका इमारतीचे सांडपाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी सावंतवाडी नगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, पालिकेचे संबंधित कर्मचारी याकडे सातत्याने दुर्लक्ष करत होते. त्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण होते.शनिवारी श्री मारुती मंदिरात दर्शनासाठी आलेले असताना, एका सजग भाविकाने या समस्येबाबत नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांना माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निरवडेकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने घटनास्थळी भेट दिली. केवळ पाहणी करून न थांबता, नगराध्यक्षांनी तत्काळ सफाई कामगारांना घटनास्थळी पाचारण केले. त्यांच्या उपस्थितीत सांडपाण्याची वाहिनी स्वच्छ करून घेण्याचे काम पूर्ण करण्यात आले. अनेक दिवस प्रलंबित असलेला हा प्रश्न नगराध्यक्षांच्या हस्तक्षेपामुळे अवघ्या एका तासात सुटला. नगरपालिकेत तक्रार देऊनही काम होत नसल्याने नागरिक त्रस्त होते, मात्र नगराध्यक्षांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे प्रशासकीय कामाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे असे मत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले.










