युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना तिघांची ईडीकडून चौकशी

Edited by: ब्‍युरो
Published on: June 18, 2025 13:10 PM
views 78  views

नवी दिल्‍ली : भारतीय संघाचे दिग्गज क्रिकेटपटू अडचणीत सापडले आहेत. भारताला विश्वविजेत्या बनवणाऱ्या संघाचे भाग असलेले युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. या तिघांव्यतिरिक्त अभिनेत्री उर्वशी रौतेलाचीही चौकशी करण्यात आली आहे. पण नेमकं प्रकरण काय आहे, जाणून घेऊया.

हरभजन, युवराज आणि सुरेश रैना यांच्याबरोबर अभिनेता सोनू सूद आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. यांच्यावर बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग ॲप्ससाठी जाहिराती केल्याचा आरोप आहे. वन एक्स बेट, फेयरप्ले, पारिमॅच आणि लोटस ३६५ सारख्या बंदी घातलेल्या प्लॅटफॉर्मशी जाहिराती करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले आहेत. सध्या या बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग ॲप्सचा तपास केला जात आहे.

वन एक्स बेट सारख्या बंदी घातलेल्या प्लॅटफॉर्मच्या जाहिरातीमध्ये या सेलिब्रिटींच्या सहभागाबाबत चौकशी करण्यात आली आहे. बंदी घातलेल्या या ऑनलाईन बेटिंग अॅप्सबाबत आधीच चौकशी सुरू आहे, त्याबाबतच यांना प्रश्न विचारण्यात आले. हे प्लॅटफॉर्म ‘1xbet’ सारखी प्रतिनिधी म्हणून इतर नावांचा वापर करत होते ज्यात वेब लिंक्स आणि QR कोड होते जे युजर्सना बेकायदेशीर बेटिंग प्लॅटफॉर्मवर रिडायरेक्ट करतात आणि जे कायद्यांचे उल्लंघन आहे.

ईडीने म्हटले आहे की या प्लॅटफॉर्मने स्किल बेस्ड गेम असल्याचे सांगितले होते, परंतु त्यांनी बनावट अल्गोरिदम वापरले होते. ज्यामुळे आता हे अॅप्स भारतीय कायद्यांनुसार जुगार खेळ असणारे आहेत. युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांनीही ‘1xbet’ प्लॅटफॉर्मसाठी जाहिरात केली आहे, त्यानंतर या तिन्ही दिग्गजांची चौकशी करण्यात आली आहे.

फेडरल एजन्सीने केलेल्या प्राथमिक चौकशीत असे दिसून आले आहे की माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायदा, परकीय चलन व्यवस्थापन कायदा आणि मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा तसेच सरकारी सूचनांसह अनेक कायद्यांचे उल्लंघन झाले असावे.

वृत्तानुसार, जेव्हा युवराज सिंग आणि सुरेश रैना यांच्याशी संबंधित लोकांना या बातमीवर टिप्पणी करण्यास सांगितले गेले तेव्हा त्यांनी नकार दिला. इतर अनेक संस्थांचीही चौकशी सुरू आहे. अहवालानुसार, ‘1xbet’ कंपनीने त्यांच्या जाहिरातींवर ५० कोटींहून अधिक रुपये खर्च केले आहेत.

बेकायदेशीर बेटिंग अॅप्सवरील कारवाई ही यापूर्वीही केली गेली आहे. अनेक सेलिब्रिटीजकडून या अॅप्सचं प्रमोशन केलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. मे महिन्यात तेलंगणा पोलिसांनी राणा दग्गुबाती आणि प्रकाश राज यांच्यासह २५ लोकप्रिय अभिनेत्यांवर गुन्हे दाखल केले होते.