चितगाव : बांगलादेश येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषक २०२२ चा दुसरा सामना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात खेळला गेला. जेमीमाह रोड्रिगेझच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय मिळवत महिला आशिया चषकात विजयी सलामी दिली. श्रीलंका पूर्ण षटके देखील खेळू शकली नाही. सर्वबाद १०९ धावा केल्या. या सामन्यात भारताने जेमीमाह रोड्रिगेझ आणि हरमनप्रीत कौर यांच्या भागीदारीने दीडशतकी धावसंख्या उभारली आहे. जेमीमाहने महत्वाची खेळी केल्याने भारताने २० षटकात सहा गडी गमावत १५० धावा केल्या. तिलाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
श्रीलंकेने धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवात केली. संघाची धावसंख्या २५ असतानाच कर्णधार चमारी अट्टापटू ही ५ धावा करून बाद झाली. त्यानंतर एका पाठोपाठ एक गडी बाद होत गेले. भारताची गोलंदाज हेमलताने सर्वाधिक ३ बळी घेतले. पूजा वस्त्रकार आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. राधा यादवने देखील एक गडी बाद करत भारताच्या गोलंदाजांना साथ दिली. श्रीलंकेकडून हसिनी परेरा हिने सर्वाधिक म्हणजेच ३२ चेंडूत ३० धावा केल्या.
तत्पूर्वी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. यावेळी सुरूवातीलाच भारताचा संघ अडखळला. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी लवकरच आपल्या विकेट्स गमावल्या. दोघींनी अनुक्रमे १० आणि ६ धावा करत बाद झाल्या. सामन्यात भारताच्या डावाची ४ षटके पूर्ण झाली असता धावसंख्या २ गडी गमावत २३ एवढी होती. भारताची स्थिती वाईट असताना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत जेमीमाह रोड्रिगेझ हीने अर्धशतकी खेळी केली आहे. तिने कर्णधार हरमनप्रीत कौर हीच्या साथीने भारताचा धावफलक हलता ठेवला.
जेमीमाह - हरमनप्रीत जोडीने ७१ चेंडूत ९२ धावांची भागीदारी केली. हरमनप्रीत ३० चेंडूत ३३ धावा करत बाद झाली. तसेच जेमीमाह ५३ चेंडूत ७६ धावा करत बाद झाली. तिने दुखापतीतून परल्यावर भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. तिने या सामन्यात १४३.४० च्या स्ट्राईक रेटने खेळताना ११ चौकार आणि एक षटकार खेचला. तिचे हे आंतरराष्ट्रीय टी-२० मधील आठवे अर्धशतक ठरले. त्याचबरोबर तिची ही आंतरराष्ट्रीय टी- २० मधील सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली आहे. तिला श्रीलंकेची कर्णधार चमीरा अट्टापट्टू हीने त्रिफळाचीत केले. नंतर आलेल्या दयालन हेमलता हीने १० चेंडूत एक चौकाराच्या साहाय्याने नाबाद १३ धावा केल्या.
श्रीलंकेकडून ओशाडी रणसिंगे हिने ३ बळी पटकावले तर सुगंधिका कुमारी आणि चामरी अथपथु या दोघींना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. या दोघींना वगळले तर कोणत्याच श्रीलंकन गोलंदाजाला बळी घेण्यात यश आले नाही.