आशिया चषक 2023 पूर्वी विराट कोहली चांगलाच उत्सुक दिसत आहे. आशिया चषक सुरू होण्याआधीच विराटने कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय संघाच्या या माजी कर्णधारने या आगामी स्पर्धेसाठी जिममध्ये घाम गाळायला सुरुवात केली आहे. 15 ऑगस्ट रोजी सुट्टी असून देखील विराटने जिममध्ये मेहतन घेतल्याचे दिसते.
नुकताच भारतीय संघाचा वेस्ट इंडीज दौरा पार पडला. या दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेत विराट कोहली (Virat Kohli) खेळला होता. मात्र, टी-20 मालिकेत विराटसह रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांना विश्रांती दिली गेली होती. यानंतर विराट आता थेट आशिया चषक 2023 स्पर्धेत खेळताना दिसेल, जी 30 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. भारतीय संघाला आशिया चषकातील आपला पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत खेळायचा आहे.
तत्पूर्वी विराट कोहली याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून जिममध्ये घाम गाळतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओत विराट ट्रेडमीलवर धावताना दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, “सुट्टी आहे पण तरी धावाव लागेलच.” विराटच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.
दरम्यान, यावर्षीच्या आशिया चषकात एकूण 13 सामने खेळले जाणार आहेत. दीर्घ काळ चाललेल्या वादानंतर आशिया चषकाचे जयमानपद पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात विभागून दिले गेले आहे. भारतीय संघाने या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिल्यामुळे यजमानपद श्रीलंकेलाही विभागून मिळाले. यावर्षी या आशिया चषक वनडे फॉरमॅटमध्ये खेळला जाणार असून तीन-तीन संघांचे दोन ग्रुप पाडले आहेत. भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघ ग्रुप ए मध्ये आहेत, तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे तीन संघ आहेत.