विराट रेकोर्ड ; एकाच दिवसात सचिनचे दोन विक्रम तोडले

शतकांचं अर्धशतक पूर्ण
Edited by: ब्युरो
Published on: November 15, 2023 17:40 PM
views 582  views

मुंबई: शानदार फॉर्ममध्ये असलेला भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने २०११ पासून नॉकआउट सामन्यातील अपयशाचा ठपका वानखेडे मैदानावर पुसून टाकला. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या वर्ल्डकप २०२३ मधील सेमीफायनल लढतीत विराटने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी धमाकेदार सुरूवात करून दिल्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला. रोहितने विराटला स्थिर होण्यासाठी पुरेसे वातावरण तयार करून ठेवले होते. या संधीचा फायदा त्याने सोडला नाही. आधी गिल आणि नंतर श्रेयस अय्यर सोबत विराटने महत्त्वाची भागिदारी केली. विराटने २७व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर या वर्ल्डकपमधील सहावे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर ३४व्या षटकात विराटने सचिन तेंडुलकरचा २० जुना विक्रम मागे टाकला. सचिनने २००३च्या वर्ल्डकपमध्ये ६७३ धावा केल्या होत्या. वर्ल्डकप क्रिकेटच्या इतिहासात एका स्पर्धेत कोणत्याही फलंदाजाला इतक्या धावा करता आल्या नव्हत्या. २०१९ साली रोहित शर्माने ६४८ आणि डेव्हिड वॉर्नरने ६४७ धावा केल्या होत्या. हे दोन फलंदाजी सचिनच्या जवळ पोहोचले होते. पण त्यांना विक्रम मोडता आला नाही. सचिनचा हा विक्रम विराट कोहलीने आता मागे टाकला आहे. विराटने या स्पर्धेत २ शतकं आणि ६ अर्धशतकांसह ६७४ हून अधिक धावा केल्या आहेत. एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आता विराटच्या नावावर झालाय. विशेष म्हणजे विराटने याच स्पर्धेत सचिनच्या वनडेमधील ४९ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. वर्ल्डकपमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडल्यानंतर विराट कोहलीने सचिनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आणखी एक मोठा विक्रम मोडीत काढला. वनडे सर्वाधिक शतकांच्या सचिनच्या विक्रमाला विराटने मागे टाकले. विराटने न्यूझीलंडविरुद्ध शतकी खेळी करत सचिनचा विक्रम मोडला. विराटने फक्त २७९ डावात ५० शतक केली. सचिनला ४९ शतकांंसाठी ४००हून अधिक डाव लागले होते. विराटच्या या खेळीत त्याने केलेला आणखी एक मोठा विक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने रिकी पॉन्टिंगच्या १३ हजार ७०४ धावांचा विक्रम मागे टाकला. विराटच्या पुढे आता कुमार संगकारा १४ हजार २३२ धावांसह दुसऱ्या तर १८ हजार ४२६ धावांसह सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे.