सावंतवाडी : पुणे येथे झालेल्या 'द जम्पिंग गोरिला ट्रेल रन चॅम्पियनशिप'मध्ये सिंधू रनर टीमने उत्तम कामगिरी करून घवघवीत यश संपादन केले. द जम्पिंग गोरिला ट्रेल रन चॅम्पिअनशिप ही इट्रा (ITRA) (इंटरनॅशनल ट्रेल रन अससोसिएशन) कडून मान्यता प्राप्त अल्ट्रा ट्रेल रन आहे. द इंडियन स्पोर्ट रेवोल्युएशन टीमकडून आयोजित होणाऱ्या या रनमध्ये जगभरातून चॅम्पियन रनर येतात. पुण्यातील आदीनाथ नाईक आणि जयगोविंद यादव या अल्ट्रा रनरच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या रेसमध्ये या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ओंकार पराडकर, मेघराज कोकरे आणि प्रसाद गोलम या धावकांनी सहभाग नोंदवला.
'कात्रज ते सिंहगड' ट्रॅक रस्त्यावर होणाऱ्या या रेसमध्ये उंच डोंगर, अवघड चढण, घनदाट जंगल, निसरडा अरुंद मार्ग या अडथळ्यामुळे ही रेस खूप अवघड आणि रनरची क्षमता तपासणारी मनाली जाते. जागतिक पातळीवर होणाऱ्या UTMB (The Ultra Trail du Mont Blanc) रेसची पात्रता रन म्हणून ही रन ओळखली जाते. या वर्षी या रेससाठी जगभरातल्या ६ ते ७ वेगवेगळ्या देशातील धावक सहभागी झाले होते. सिंधू रनर टीमचे धावक २५ किलोमीटर रन विभागात सहभागी झाले होते.
पुण्यातील जुना कात्रज बोगदापासून सकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी रेस चालू झाली. २५ किलोमीटर अंतर आणि १६०० मीटर चढण असलेली ही अवघड रन फक्त ७ तासात पूर्ण करण्याचा निर्धारित वेळ दिला गेला होता. दरम्यान, मेघराज कोकरे याने तब्बल ३ तास आणि ५१ मिनिटात सदर रेस पूर्ण करून सर्व धावकात ३ रे स्थान पटकावले आणि सिंधू रनर टीमचे नाव विजयी धावकांच्या यादीत कोरले. मेघराज सावंतवाडीतील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असून तो सावंतवाडीतील कारिवडे गावचा सुपुत्र आहे. ओंकार पराडकर आणि प्रसाद गोलम याने ही रन ६ तासात पूर्ण करून एवढी अवघड रन पूर्ण करणाऱ्या धावकात स्थान मिळवले.
कात्रज ते सिंहगड घाटात येणारे चढ-उतार, निसरडी पायवाट, उंच उंच डोंगर, कडे आणि यातून पण स्वतःचे पाणी आणि खाद्य साहित्य घेऊन धावणे या सगळ्या अडचणींवर मात करून टीमने अव्वल स्थान पटकावले आणि उपस्थित सगळ्या रनिंग टीमचे लक्ष्य वेधले.
या अतुलनीय कामगिरीबद्दल या सर्व टीम मेंबर्सचे कौतुक होत आहे. रेस डायरेक्टर आदीनाथ नाईक आणि जयगोविंद यादव, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले, सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, डॉ. शंतनू तेंडुलकर, डॉ. स्नेहल गोवेकर, डॉक्टर्स असोसिएशन ऑफ सावंतवाडी तसेच सावंतवाडी रिक्षा चालक - मालक संघटना, दैनिक कोकणसाद, सर्व पत्रकार बंधू आणि प्राचार्य डॉ. बाबासाहेब पाटील (आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडी) अशा सर्व मान्यवरांकडून सिंधू रनर टीमचे कौतुक व अभिनंदन होत आहे. अशीच कामगिरी सिंधू रनर टीम यापुढेही बजावत राहील, तसेच सिंधुदुर्गात नवनवीन धावक तयार होऊन त्यांना नवीन व्यासपीठ मिळावे, यासाठी सिंधू रनर टीम प्रयत्न करत आहे, असे ओंकार पराडकर यांनी सांगितले.