वैभववाडीच्या कन्येचा बांगलादेशात डंका ; सुवर्ण, कांस्य पदकांची केली कमाई !

स्पर्धेत ७५० स्पर्धकांचा सहभाग
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 05, 2023 20:10 PM
views 364  views

वैभववाडी : तालुक्यातील मुळ कुंभवडे गावची कन्या असलेल्या सृष्टी संजय चव्हाण हिने बांगलादेश येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक व कांस्य पदक मिळविले आहेत. बांगलादेश येथील ढाका येथे नुकतीच ही स्पर्धा झाली.या स्पर्धेत ७५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

बांगलादेश गोजू र्यू कराटे फेडरेशन यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय बी. जी. कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत इंडोनेशिया, नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांगलादेश आणि भारत या देशांमधील  एकूण ७५० स्पर्धक सहभागी झाले होते. मुंबईचा संघ या स्पर्धेत सहभागी झाला होता. सृष्टी ही त्यांच्यासोबत होती. तिने वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. तसेच संघासाठी कांस्य पदक मिळवून दिले.

सृष्टी ही मुळ कुंभवडे गावची असली तरी ती वास्तवास मुंबईत आहे. ती अंधेरीमधील सेंट झेवीयर्स स्कूलमध्ये इयत्ता ९ वीत शिकत आहे. शिक्षणासोबतच ती कराटे शिकत आहे. बांगलादेशमध्ये आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी ती गेली होती. या स्पर्धेत तिने  जबरदस्त कामगिरी केली आहे. प्रशिक्षक धीरज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या संघाने २४ पदकांची कमाई  केली आहे.